Join us

Coronavirus: धारावीकरांना कोरोनामुक्त करा; १०० फुटांच्या घरात युद्ध आमचे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 1:16 AM

दुर्दैव म्हणजे धारावीमध्ये कोरोनाला थोपविण्यासाठी पुरविण्यात येत असलेल्या सेवासुविधांचे केवळ मार्केटिंग सुरु आहे

सचिन लुंगसे 

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा शासन निर्णय होऊन आजमितीस १६ वर्षे लोटली आहेत; आणि पुनर्विकास नावालादेखील झालेला नाही. परिणामी शासकीय धोरणांमुळे धारावी आणि धारावीकरांचे हाल सुरूच आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण झाला असता तर आज कोरोनामुळे एवढ्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या नसत्या.

दुर्दैव म्हणजे धारावीमध्ये कोरोनाला थोपविण्यासाठी पुरविण्यात येत असलेल्या सेवासुविधांचे केवळ मार्केटिंग सुरु आहे. धारावी आणि धारावीकरांना कोरोनामुक्त करा, असे म्हणणे मांडले जात आहे. धारावीत मास स्क्रिनिंंग करण्याचा कार्यक्रम मोठा गाजावाजा करून सुरू केला. ७.५ लाख लोकांचे स्क्रिनिंंग करणार असल्याची जाहिरात करण्यात आली. मात्र आठवड्याभरात उत्साह ओसरला. सध्या ही मोहीम बंद पडली. त्यामुळे मार्केटिंंग आणि जाहिराती करू नयेत, तर  प्रत्यक्षात काम करत धारावीला कोरोनामुक्त करावे, असे म्हणणे मांडले जात आहे.

  • धारावीत सुमारे १५० खासगी डॉक्टर प्रॅक्टिस करतात. या सर्व खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने तात्काळ सुरू करावेत.
  • धारावीतील परराज्यातील मजुरांना ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही; अशांना शासनाच्या वतीने पुरविणे आवश्यक असलेल्या मोफत अन्नधान्याचे वितरण सुरू करा.
  • मजुरांकरिता कम्युनिटी किचन सुरू करा. दोन वेळेच्या सकस आहाराची व्यवस्था करा.
  • शिधापत्रिकाधारकांमध्ये भेद करू नका. मोफत रेशनवाटपाची व्यवस्था करा.

 

धारावीत कोरोनाला हरवायचे असेल तर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिकेच्या सर्व यंत्रणांमध्ये एक सुसंवाद, नियोजन असणे आवश्यक आहे. नागरिकांची मते जाणून घेणे गरजेचे आहे. त्यांचे सहकार्य मिळणे गरजेचे आहे. सहायक मनपा आयुक्त, आमदार, मंत्री, खासदार आणि नगरसेवक यांनी एकत्र येत काम केले पाहिजे. असे केले तरच आपण कोरोनाला हरवू शकतो. - अ‍ॅड. राजेंद्र कोरडे,अध्यक्ष, धारावी पुनर्विकास समिती

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या