मुंबई : मालाडच्या पी. उत्तर विभागात मोडणाऱ्या क्वॉरंटाइन सेंटरमध्ये पालिकेच्या हलगर्जीपणामुळे जनार्दन सारंग (४६) नामक व्यक्तीला रविवारी रात्री जीव गमवावा लागला. आम्ही मदतीसाठी ओरडत होतो, पण कोणी आले नाही, असे कुटुंबीयांनी सांगितले.मालाडमध्ये राहणाºया सारंग यांच्या शेजारी एक २५ वर्षीय तरुणी कोरोना झाला होता. तरीही सार्वजनिक स्वछतागृह, परिसराचे सॅनिटायझेशन काहीच केले नाही. त्यानंतर तिच्या आईलाही कोरोना झाला. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सारंग, त्यांच्या दोन मुली, पत्नी आणि शेजारच्या कुटुंबासह सात जणांना मालाड पश्चिमच्या चिंचवली बंदर मनपा शाळेत असलेल्या एका खोलीत क्वॉरंटाइन केले. मात्र तेथे स्वच्छता आणि खाण्यापिण्याची योग्य सोय नव्हती. त्यामुळे सारंग अशक्त झाले. त्यातच पायाला सूज आली. तक्रार करूनही त्यांना पालिकेकडून उपचार मिळत नव्हते. फॅमिली डॉक्टरशी संपर्क साधून त्यांनी औषध घेतले. रविवारी आंघोळीसाठी जाताना ते पाय घसरून पडले आणि बेशुद्ध झाले. कुटुंबाने मदरीसाठी आरडाओरड केली. मात्र सेंटरमधून कोणीच त्यांच्या मदतीला आले नाही. जवळपास अर्धा तास होऊनही मदत न मिळाल्याने अन्य क्वॉरंटाइन लोकानी सुरक्षारक्षकाला दरडावत गेट उघडून घेतला. मात्र रुग्णवाहिकेअभावी सारंग यांना पत्नी आणि मुलींनीच रिक्षातून रुग्णालयात नेले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.त्यानंतर क्वॉरंटाइन असूनही कुटुंबाला पुन्हा क्वॉरंटाइन सेंटरला न पाठवता पालिकेच्या अधिकाºयांनी थेट घरी पाठवून दिले. त्यामुळे संबंधित विभागाच्या निष्कळजीपणामुळे एकाचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांकडून होत आहे. याबाबत चौकशी करून संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आश्वासन पी उत्तरचे सहायक आयुक्त संजोग कबरे यांनी दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
CoronaVirus News: आम्ही मदतीसाठी ओरडत होतो, पण कोणी आले नाही; कुटुंबीयांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 4:40 AM