coronavirus: अमेरिकेत शिक्षणासाठी गेली, कोरोनामुळे अडकली; आईवडील चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 07:26 AM2020-05-10T07:26:02+5:302020-05-10T07:27:11+5:30
अपेक्षासह तेथील अन्य मुलांना मायदेशी परतता यावे, यासाठी भारतीय दूतावास प्रयत्नशील आहे
मुंबई : अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेली जुन्नरची अपेक्षा नलावडे कोरोनामुळे अमेरिकेत अडकून पडली आहे. तिच्या काळजीने आईवडिलांच्या जीवाला घोर लागला आहे, तर अपेक्षासह तेथील अन्य मुलांना मायदेशी परतता यावे, यासाठी भारतीय दूतावास प्रयत्नशील आहे.
अपेक्षा अमेरिकेतील युनिव्हर्सिटीत मास्टर आॅफ सायन्स पदवीचा अभ्यास करत असून शेवटच्या वर्षात शिकत आहे. तिच्यासह तिथे पुणे, मुंबईसह भारतातील एकूण २० मुले-मुली आहेत. अमेरिकत कोरोनाची सर्वाधिक दहशत आहे. त्यातच युनिव्हर्सिटीतही कोरोना रुग्ण सापडल्याने ऐन विशीतील ही मुले घाबरली आहेत. आजूबाजूचे भारतीय मॉल्स, शॉप बंद झाले आहेत.
अपेक्षा ही धोलवड (जुन्नर) येथील प्रणाली व सोपान नलावडे यांची एकुलती एक मुलगी आहे. वृद्ध आई झोपल्यानंतर पती-पत्नी रात्रभर अपेक्षा व तिच्या तीन मैत्रिणींना व्हिडीओ कॉलद्वारे धीर देतात. इंटरनेट असुविधेमुळे अनेकदा बोलणे अर्धवटच राहते आणि चिंता अधिकच वाढते, असे त्यांनी सांगितले.
मुलीच्या काळजीने मागील दीड महिना नीट जेवण जात नाही की धड झोपही येत नाही, असे नलावडे दाम्पत्याने काळजीच्या स्वरात सांगितले.
दरम्यान, अमेरिकेत अडकलेल्या भारतातील जवळपास सर्वच मुलामुलींच्या पालकांना याच परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा भयग्रस्त वातावरणातही ही सर्व मुले-मुली परस्परांशी संवाद साधून एकमेकांना धीर देत आहेत. त्यांनी भारतीय दूतावासाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
तुम्ही घाबरू नका, आमच्या संपर्कात राहा, आम्ही सर्वांना एकत्र एका हॉटेलमध्ये हलविण्याच्या प्रयत्नात आहोत, असे दूतावासाने कळविले आहे, अशी माहिती अपेक्षाचे मुंबईतील चांदिवलीमध्ये राहणारे काका संजय नलावडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
गुणवत्तेची कदर
कोरोनामुळे अवघे जग आर्थिक मंदीच्या सावटाखाली आहे. अशाही परिस्थितीत अपेक्षाच्या अर्जाचा विचार करीत आणि तिच्यातील गुणवत्तेची कदर करत कॅलिफोर्नियातील केडन्स कंपनीने तिला नोकरीचे आॅफर लेटर दिले आहे. त्यामुळे कोरोनाचे सावट असले तरी तिथे अजूनही भारतीय गुणवत्तेची कदर होत आहे, असे अपेक्षाचे वडील सोपान नलावडे यांनी सांगितले.
सामाजिक भान
अपेक्षाची काळजी सतावत असली तरी तिला मिळालोलाी नोकरी आणि लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाचा आनंद समाजासाठी काहीतरी करून साजरा करायचा, असे नलावडे दाम्पत्याने ठरवले. त्यानुसार, राजाराम पाटील वृद्ध आधार केंद्र (वृद्धाश्रम) जुन्नर येथील वृद्धांसोबत साधेपणाने व देणगी देऊन आनंद साजरा केला. लॉकडाउनमुळे गेले महिनाभर आश्रमाकडे माणुसकीने कानाडोळा केला होता. मात्र, नलावडे दाम्पत्यााने सामाजिक भान जपून समाजासमोर चांगला आदर्श ठेवला.