CoronaVirus News: मोठी बातमी! अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आजपासून लोकल धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 12:07 AM2020-06-15T00:07:29+5:302020-06-15T06:30:02+5:30
१५ ते २० मिनिटांच्या अंतरानं पश्चिम, मध्य रेल्वेवर लोकल धावणार
मुंबई : मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. या फेऱ्या १५ ते २० मिनिटांच्या अंतराने धावतील. सर्व लोकल १२ डब्यांच्या असून हार्बर , ट्रान्सहार्बर वगळता अन्यत्र त्या जलद मार्गावर धावतील. यासाठी मोटरमन सज्ज झाले आहेत. त्यांना कोरोनाबाबत खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. त्यावर रविवारी राज्य सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र सोमवारी लोकल धावणार की नाही, याबाबत मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
या अत्यावश्यक सेवेच्या लोकल फक्त जलद मार्गावर पॉइंट टू पाइंट धावतील. या सर्व लोकल जलद लोकल असतील. प्रवाशांना रेल्वेकडून कोणतेही तिकीट देण्यात येणार नाही. राज्य सरकार कामगार-कर्मचाºयांची यादी रेल्वेला देण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व तिकिटे राज्य सरकारकडे येतील. या तिकिटांचे आगाऊ पैसे राज्य सरकार रेल्वेला देईल. प्रवास करणाºया कर्मचारी, कामगारांना राज्य सरकार क्यूआर कोड असलेले आयकार्ड देईल. हा कोड स्कॅन करूनच लोकलमध्ये प्रवेश मिळेल. गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकार कार्यालयीन वेळा ठरवेल. कामगारांचे तिकीट, थर्मल तपासणीची जबाबदारी राज्य सरकारची असणार आहे. रेल्वे पोलिसांच्या मदतीला आरपीएफ जवान तैनात केले जाणार आहेत.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तब्बल ८५ दिवसांनंतर पश्चिम रेल्वे मार्गावर १४६, मध्य रेल्वे मार्गावर १३०, हार्बर मार्गावर ७० फेºया धावणार असल्याची चर्चा होती. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांना बेस्ट, एसटीच्या बसद्वारे सेवा पुरविली जात आहे. मात्र आता फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी लोकल सुरू होणार आहेत.