Coronavirus : महिन्याभरात पश्चिम रेल्वेला बसला तब्बल 207 कोटींचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 04:45 PM2020-04-01T16:45:16+5:302020-04-01T16:54:13+5:30
Coronavirus : कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी 22 मार्चपासून लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला.
मुंबई - कोरोना विषाणूमुळे सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. परिणामी, भारतीय रेल्वेसह पश्चिम रेल्वेची सेवा बंद आहे. 1 मार्च ते 31 मार्च या एका महिन्यात अनेक प्रवाशांनी लांब पल्ल्याचे तिकीट रद्द केले. तर 22 मार्चपासून लोकल बंद आहे. त्यामुळे संपूर्ण मार्च महिन्यात पश्चिम रेल्वेला 207 कोटींचा फटका बसला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी 22 मार्चपासून लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा बंद झाली. परिणामी, 1 मार्च ते 31 मार्च पर्यंत पश्चिम रेल्वेला लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि लोकल मधून मिळणारे उत्पन्न बुडाले.
पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या प्रवासी वाहतुकीतून मिळणारे आणि इतर माध्यमातून मिळणारा महसूल सुद्धा बुडत आहे. 22 मार्च या एका दिवशी 79 कोटी रुपयांचे सर्वाधिक नुकसान झाले. त्यानंतर 24 मार्चपर्यंत 107 कोटी, 26 मार्च पर्यंत 135 कोटी 66 लाख रुपये, 28 मार्च पर्यंत 163 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. तर, 1 मार्च ते 31 मार्च पर्यंत 207 कोटी 11 लाखांचा फटका बसला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेल्वे मंत्रालयाने मुंबईची उपनगरीय लोकल, देशातील लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस, कोलकता मेट्रो 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळे 21 दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. परिणामी, 14 एप्रिलपर्यंत लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्याही बंद राहणार आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वेलाही याचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वेला प्रवाशाच्या तिकीट दरासह इतर अनेक बाबीतून उत्पन्न मिळते. मात्र हे उत्पन्न आता मिळणे बंद झाले आहे. विनातिकीट प्रवासी, जाहिरातीमधून पश्चिम रेल्वेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र आता हे उत्पन्न बुडत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...
Coronavirus : 'मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही', मौलानांची 'ती' ऑडिओ क्लीप व्हायरल
Coronavirus : चिंताजनक! भारतातील 'ही' नऊ ठिकाणे ठरली कोरोनाचे हॉटस्पॉट, गाठली धोक्याची पातळी
Coronavirus : ...म्हणून 'त्या' जोडप्याने आपल्या मुलाचं नाव ठेवलं 'लॉकडाऊन'