Coronavirus: काेराेनाने मला काय शिकवले?; कमी पैशांत घर कसं चालवायचं ते शिकवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 08:23 AM2021-03-22T08:23:51+5:302021-03-22T08:24:13+5:30

लॉकडाऊनच्या काळात लोकांना कुटुंबातील सदस्यांनी कोणत्याही परिस्थितीत एकत्र असावं, याची जाणीव झाली. या काळात आम्हाला एकत्र असण्याचा खूप फायदा झाला.

Coronavirus: What did Coronavirus teach me ?; Taught how to run a house for less money | Coronavirus: काेराेनाने मला काय शिकवले?; कमी पैशांत घर कसं चालवायचं ते शिकवलं

Coronavirus: काेराेनाने मला काय शिकवले?; कमी पैशांत घर कसं चालवायचं ते शिकवलं

googlenewsNext

मागील वर्षांपूर्वी कोरोनाची साथ आली आणि त्यामुळे सक्तीने लॉकडाऊन झाला. अत्यंत तातडीच्या सेवांव्यतिरिक्त सगळं बंद झालं. कोणाकडे जायचं नाही, यायचं नाही. कुणाशी हात मिळवायचा नाही. थोडक्यात काय तर स्वतःला घरात बंदिस्त करून घ्यायचं. संपूर्ण जग स्तब्ध झाल्यासारखं वाटत होतं. विनाकारण केल्या जाणाऱ्या खर्चाला खीळ बसली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी पैशातही घर चालवता येऊ शकतं हा धडा या कोरोनामुळे मिळाला. या काळात प्रत्येकाला बरे-वाईट अनुभव आले. कोरोनाने लोकांना बरेच दिवस घरात बंदिस्त करून ठेवलं. लोकांनी एकत्र कुटुंबातील सर्वच सदस्यांसोबत राहून तणावमुक्त आनंदी जीवनाचा अनुभव घेतला. लॉकडाऊनच्या काळात लोकांना कुटुंबातील सदस्यांनी कोणत्याही परिस्थितीत एकत्र असावं, याची जाणीव झाली. या काळात आम्हाला एकत्र असण्याचा खूप फायदा झाला. त्यामुळे बंदीच्या काळातही कशाचीच कमतरता भासली नाही.  याउलट आपलं स्वतःचं घर सोडून रोजगारासाठी दूर शहरात राहणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. मदतीला येईल असं कोणीही जवळचा माणूस नाही, त्यामुळे एकटेपणा जास्त जाणवला. या लॉकडाऊनमध्ये आम्ही बरीच पुस्तकं वाचली. नियमितपणे केलेल्या वाचनामुळे ज्ञानात भर पडली. शिवाय पुस्तकांसोबत वेळ कसा गेला ते कळलंच नाही. कोरोनाने गरीब-श्रीमंत, काळा-गोरा अशा प्रत्येकाला स्वच्छता आणि निरोगी जीवन कसं जगायचं हे शिकविलं.   - दादासाहेब येंधे, मुंबई 

शेजारधर्म कसा सांभाळायचा ते शिकवले
कोरोनाने केवळ शिकवलेच नाही तर तसे वागायला भाग पाडले. स्वच्छता, संयम, सहनशीलता, माणुसकी, आर्थिकदृष्ट्या दूरदृष्टी ठेवून नियोजन कस करायचं ते शिकवलं. खरंच कोरोनाने 'न भूतो न भविष्यति' अशी अनुभूती दिली. हे प्रलयंकारी कोरोना संकट मार्चअखेरीस ओढवलं आणि या संकटाची परिणती टाळेबंदीमध्ये झाली. क्षणार्धात जनजीवन एखाद्याने स्टॅच्यू म्हणावं आणि समोरच्याने जिथल्या तिथे थांबावं, तसं थांबलं. पहाटे ५.३० ला उठून करावी लागणारी मुलांची शाळेची तयारी, डबे, योगा क्लास, रोजचा बाजारहाट हा माझा नित्यनेम एका क्षणात थांबला. जीवनावश्यक असलेला किराणा माल तसेच भाजीपालाही ठरावीक वेळीच मिळत असल्यामुळे वेळेत न गेल्यास काहीच मिळत नव्हतं. बाहेरच्या खाण्याने पैसा तर जातोच; शिवाय आरोग्याचीही हानी असे दुहेरी नुकसान होते याची तीव्रतेने जाणीव झाली. घरच्या भाजी-भाकरीची किंमत कळली. स्वच्छतेची काळजी घेतली तर इतरही अनेक आजारांना आळा बसतो याचा अनुभव घेतला. सतत घरात असल्यामुळे माझा किती वेळ वाया जातो आणि कुठे जातो याची जाणीव मला झाली. आळस झटकून वेळेचं व्यवस्थित नियोजन केलं तर सारं काही शक्य होतं, हे लक्षात आलं. अडीअडचणीत शेजारी पहिले धावून येतात. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींवरून न भांडता एकमेकांना समजून घेऊन शेजारधर्म सांभाळणं किती गरजेचं आहे, हे कोरोनाने शिकवलं. - अनघा सावंत, मुंबई

कोरोनाने जगण्याचा नवा मंत्र दिला
कोरोनाकाळात खूप साऱ्या संकटांना तोंड द्यावे लागले. मात्र, या कोरोनाने मला भरपूर गोष्टी शिकवल्या. मुंबईत जगण्यासाठी लागणारे कौशल्य माहीत पडले. कठीण प्रसंगांना तोंड देण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. तसेच एक गोष्ट माहीत पडली की, नोकरी कायमस्वरूपी नाही. ती आज आहे, उद्या नाही. मात्र, स्वतःचा व्यवसाय असेल तर आपण मुंबईसारख्या शहरामध्ये जगू शकतो. कोरोनामुळे मास्क वापरणे हे किती महत्त्वाचे आहे, ते समजले. भारतासारख्या देशामध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. मास्कमुळे आपण प्रदूषणापासून वाचू शकतो. तसेच मास्क आणि स्वच्छतेच्या सवयीमुळे आपण आजारापासून दूर राहू शकतो. आजपर्यंत आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही प्रयत्न केले नव्हते, मात्र आपण कोरोना आल्यापासून जास्तीत जास्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला. या कठीण काळात पैशांची बचत कशी करावी, हे शिकलो. स्वतःच्या गरजेप्रमाणे पैसे खर्च करावेत, हे देखील कोरोनाने शिकवले. कोरोनाने नातेसंबंध जपत तसेच स्वतःच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यातला आनंद देऊन जगण्याचा नवा मंत्र दिला.
- महेश नाईक, मुंबई

कोरोनाने 'आत्मनिर्भर' व्हायला शिकविले
कोरोनविरुद्धच्या युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या. स्वच्छतेच्या सवयींपासून ते नात्यांच्या संदर्भापर्यंत, स्वास्थ्याबद्दलच्या जागरूकतेपासून सामाजिक जबाबदारीपर्यंत असे अनेक धडे कोरोनाने मला दिले. थोडक्यात काय, तर कोरोनाने 'आत्मनिर्भर' व्हायला शिकविले. या काळात काय महत्त्वाचे आहे आणि कोणत्या गोष्टी तात्पुरत्या, शोभेच्या आहेत, यातील फरक अधिक स्पष्ट झाला. या विषाणूने आपल्या परंपरा, रूढी म्हणजेच आयुर्वेद आणि योगा, इत्यादींचे महत्त्व सांगितले. आपले स्वास्थ्य हे आपल्याच हाती आहे, ही मुख्य शिकवण कोरोनाने दिली. हवामान बदलामुळे ताप, सर्दी होणे हा दरवर्षी ठरलेला नियम! पण कोरोनाकाळात घेतलेल्या दक्षतेमुळे व आरोग्याबद्दल घेतलेल्या खबरदारीमुळे आरोग्याच्या बाबतीत त्याने अधिक सजग व्हायला शिकवले. दरवर्षी ठरलेले आजार आपण मानत आणलं तर टाळू शकतो, ही शिकवण कोरोनाने दिली. दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय कोरोनाने मोडीत काढली. स्वतःची कामे स्वतः करता येणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव या काळात झाली. अनिश्चित भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे, बचत करणे यासारख्या गोष्टींकडे कोरोनाने गंभीरपणे पाहण्यास शिकवले.- श्रुती हरेश काजवे, गोरेगाव, मुंबई.

Web Title: Coronavirus: What did Coronavirus teach me ?; Taught how to run a house for less money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.