सुहास शेलारमुंबई : कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अपुरे बेड, प्लाझ्मा-रक्ताची टंचाई, ऑक्सिजन-रेमडेसिविरची कमतरता अशा अनेक संकटांना तोंड देताना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अक्षरशः हतबल आहेत. अशा असाहाय्य रुग्णांच्या मदतीसाठी राज्यभरातील तरुणांनी एकत्र येऊन व्हॉट्सअप समूह तयार केला असून, या माध्यमातून आतापर्यंत जवळपास २०० कोरोनाबाधितांना जीवनदान मिळाले.
‘सपोर्ट फॉर कोविड पेशंट’ असे या व्हॉट्सअप समूहाचे नाव आहे. अहमदनगरच्या कल्याणी संध्या अंकुश या तरुणीने ११ एप्रिल २०२१ रोजी या ग्रुपची स्थापना केली आणि अल्पावधीतच त्याचे मोहिमेत रूपांतर झाले. सध्या राज्यभरातील ४० तरुण-तरुणी या समूहाशी जोडले गेले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, जळगाव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर येथील गावागावांत त्यांचे काम पोहोचले आहे.
रुग्णाला सुविधा मिळण्यात अडचणी आल्याची माहिती मिळताच त्यांचे काम सुरू होते. रुग्णालयात बेड उपलब्ध न होणे ही सध्या प्रमुख समस्या आहे. या ग्रुपमधील सदस्यस संबंधित जिल्हा रुग्णालय, वॉर रूम, जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला जाताे. रुग्णाची आरोग्यस्थिती कानावर घालून बेडसाठी सहकार्य मागितले जाते. एकदा बेड उपलब्ध झाला की रुग्णाच्या नातेवाइकाला कळवले जाते. आतापर्यंत २०० रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, रेमडेसिविर, प्लाझ्मा आणि अन्य आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याचे या समूहाचे सदस्य किरण तांबे यांनी सांगितले.
रुग्णांच्या चेहऱ्यावरले हसू हेच समाधान...
सध्या राज्यात आरोग्य सुविधांचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे बऱ्याचदा आम्हांलाही अडचणी जाणवतात. अशा वेळी एखाद्या सदस्याकडे दिवसातून १० जणांनी मदत मागितल्यास त्यांपैकी किमान सातजणांना तरी मदत मिळेल यासाठी पूर्ण टीम प्रयत्न करते. रुग्ण बरा होऊन घरी परतला की त्यांचे नातेवाईक आवर्जून फोन करून आमच्या कामाचे कौतुक करतात. रुग्णाच्या चेहऱ्यावरले हसू नवी ऊर्जा प्रदान करते, अशी प्रतिक्रिया ‘सपोर्ट फॉर कोविड पेशंट’ या समूहाचे सदस्य किरण तांबे यांनी व्यक्त केली.
बेडसाठी पाठपुरावा
असाहाय्य रुग्णांच्या मदतीसाठी राज्यभरातील तरुणांनी एकत्र येऊन हा व्हॉट्सअप समूह तयार केला आहे. रुग्णाला तत्काळ बेड मिळावा यासाठी रुग्णाची आराेग्यविषयक स्थिती सांगून संबंधित यंत्रणेकडे सातत्याने बेडसाठी पाठपुरावा केला जाताे.