मुंबई - देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबई, ठाणे परिसरात सापडत आहेत. त्यामुळे मुंबईतील जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकलसेवा अद्यापही बंद आहे. मिशन बिगीन अनेग अंतर्गत अनेक कंपन्या आणि ऑफीस सुरू झाल्याने आता लोकलसेवा कधी सुरू होणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या दीर्घ मुलाखतीमधून मुंबईतील लोकलसेवा सुरू करण्याबाबतच्या आपल्या धोरणाबाबत महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ''मिशन बिगीन अगेनअंतर्गत सर्व व्यवहार टप्प्याटप्पाने सुरू करण्यासठी नियोजन सुरू आहे. मात्र ही तारेवरसची कसरत असेल. रेल्वे सुरू करूया, वडापाव सुरू करूया, पण एकदा काय ते एक टोक स्वीकारा. तुम्हाला घाईगडबडीने निर्णय घ्यायचा आहे का? पण लक्षात घ्या, कुटुंबच्या कुटुंबे आजारी पडताहेत, मृत्युमुखी पडताहेत. मग कुटुंब मृत्युमुखी पडल्यावर घराला जे टाळं लागेल ते लॉकडाऊन ते लॉकडाऊन कोण उघडणार, घराचं जे लॉकडाऊन होईल त्याचं काय? कुटुंबच्या कुटुंब जर गेलं तर त्या घराचं टाळं कोण उघडणार, म्हणून ते टाळं नको असेल तर या गोष्टी टाळा.’’
दरम्यान, कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना हे जागतिक संकट आहे. ही वेळ केवळ आपल्यावरच आलेली नाही. या संकटावर नेमकेपणाने बोलणारे किंवा सल्ला देणारे जगात कुणी नाही. एकीकडे लॉकडाऊनला विरोध करणारे शहाणे आहेत. लॉकडाऊनमुळे काय साधले, त्यामुळे अर्थव्यवस्थेवर संकट आले आहे, असा दावा केला जात आहे. मी लॉकडाऊन उघडून देतो. पण इथे लोक मृत्युमुखी पडले तर तुम्ही त्याची जबाबदारी घेणार का. आज जे दार उघडा म्हणून सरकारदरबारी बसलेत टाहो फोडताहेत, त्यांच्यासाठी दारे उघडायला हरकत नाही. पण दारं उघडल्यानंतर तुम्ही जबाबदारी घेणार का, अर्थव्यवस्थेवर आलेल्या संकटाची जाणीव आम्हालाही आहेच.