मुंबई : रुग्णालयाबाहेर झालेले पण विविध प्राधिकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले सुमारे एक हजार मृत्यू अद्याप अधिकृत आकडेवारीत दाखविलेले नाहीत. आकडेवारीची अचूकता हाच कोरोनाविरोधातील लढाईसाठी विश्लेषणाचा मुख्य आधार असल्याने याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे, असे पत्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.मुंबईत रुग्णालयाबाहेर झालेले मृत्यू अद्यापही दाखविण्यात आलेले नाहीत. या मृत्यूंच्याबाबत वॉर्ड अधिकारी किंवा तत्सम प्राधिकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले आहे, अशांचा आकडा अजूनही जाहीर केलेला नाही. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या तीन-साडेतीन महिन्यांत असेही किमान एक हजार मृत्यू मुंबईत आहेत, ज्यांना अजूनही रेकॉर्डवर घेतलेले नाही. प्राथमिक संकलनातच आतापर्यंत किमान ४५० मृत्यू ओळखलेले आहेत. एकूणच मृत्यूच्या संख्येत एकतर त्याच दिवशी किंवा फार तर ७२ तासांत तशी नोंद होणे आवश्यक आहे. परंतू तीन महिने लोटले तरी मृत्यू रिपोर्ट न होता आणि ते लक्षात आल्यानंतर सुद्धा एकदम संख्या दिसू नये, या भीतीने रोज थोडे-थोडे करून ते मृत्यूसंख्येत अधिक करणे, ही अतिशय चुकीचे आहे.कोरोनाविरुद्धच्या लढाईत कोेणत्या आठवड्यात किती मृत्यू झाले, किती रुग्णसंख्या आढळली, म्हणजे संसर्ग किती प्रमाणात झाले आहे, हे कळण्यासाठी आकडेवारी हा अतिशय महत्त्वपूर्ण स्रोत आहे. अचूक विश्लेषणाचा तो महत्त्वपूर्ण आधार आहे. त्यामुळे नोंदी अचूक ठेवण्याचा आग्रह सातत्याने असला पाहिजे. ही विलंबाची पद्धत बंद करून अचूक आकडेवारी हाती येईल आणि त्याचे तत्काळ रिपोर्टिंग होईल, याचा आग्रह आपण धरला पाहिजे. त्या दिशेने योग्य त्या सूचना संबंधितांना द्याव्यात, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
CoronaVirus: रुग्णालयाबाहेर झालेले मुंबईतील हजार मृत्यू का दडवले?, फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 4:38 AM