मुंबई : कोरोनाबाधितांच्या गोपनीयतचा हक्कभंग होत असेल तर त्या रुग्णांची नावे जाहीर का करावीत? असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला असून त्यावर उत्तर देण्याचे निर्देश केंद्र व राज्य सरकारला दिले. विधि अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी वैष्णवी घोळवे आणि सोलापूरचे शेतकरी महेश गाडेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. ए. ए. सय्यद व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी सुनावणी होती.एखाद्या व्यक्तीची कोरोना चाचणी सकारात्मक येते तेव्हा संबंधित इमारत किंवा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करून अधिकारी हे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करतात, असे न्या. सय्यद यांनी म्हटले. हे पुरेसे नाही का? कोणत्या व्यक्तीला कोरोना झाला आहे, हे तुम्हाला का माहीत करून घ्यायचे आहे? असा प्रश्न न्यायालयाने याचिककर्त्यांना केला.उत्तर देण्याचे सरकारला निर्देश : केंद्र सरकारच्यावतीने अॅड. आदित्य ठक्कर यांनी न्यायालयाला सांगितले की, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोविड-१९ ची चाचणी सकारात्मक आलेल्या व्यक्तींची नावे जाहीर करता येणार नाहीत. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी दोन आठवडे तहकूब केली व केंद्र तसेच राज्य सरकारला यावर उत्तर देण्याचे निर्देश दिले.
coronavirus: कोरोना रुग्णांची नावे का जाहीर करावीत? - उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 5:47 AM