Join us  

जम्बो कोविड केंद्रात पाचशे खाटा वाढविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 8:57 AM

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांमधील खाटादेखील ताब्यात घेण्यास पालिकेने सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  सध्या पालिका रुग्णालय आणि जम्बो कोविड केंद्रांमध्ये पाच हजार रुग्ण दाखल आहेत. मात्र, रुग्णांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असल्याने जम्बो कोविड केंद्रांमधील खाटांची संख्या वाढविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. सध्या पाच जम्बो केंद्रांमध्ये रुग्ण दाखल करण्यात येत आहेत, तर आवश्यकतेनुसार प्रत्येकी पाचशे खाटा वाढविता येणार आहेत. 

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांमधील खाटादेखील ताब्यात घेण्यास पालिकेने सुरुवात केली आहे.पालिकेच्या सर्व २४ वॉर्डमध्ये विलगीकरण केंद्र सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अशा रुग्णांसाठी पालिकेच्या कोरोना काळजी केंद्रात १२ हजार खाटा आहेत.

मुंबईत सध्या पालिकेच्या जम्बो कोविड केंद्रापैकी नेस्को गोरेगाव फेज-एक, वांद्रे कुर्ला संकुल, रिचर्डसन अँड क्रुडास मुलुंड आणि भायखळा, मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालय येथे कोविड रुग्णांना दाखल करण्यात येत आहे. मुंबईतील सर्वात जास्त लाेकसंख्या असलेल्या या प्रभागातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी करण्यासाठी लसीकरण मोहिमेवर जोर देतानाच येथील सार्वजनिक शौचालये अधिकाधिक स्वच्छ ठेवण्यावर महापालिकेकडून भर दिला जात आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या