coronavirus: वर्क फ्रॉम होम : मुंबईकरांनो, आरोग्य सांभाळा...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 04:30 AM2020-05-15T04:30:46+5:302020-05-15T04:32:30+5:30
शारीरिक, मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन
मुंबई : कोरोनापासून जास्तीत जास्त लोकांचा बचाव करता यावा, यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. मात्र लॉकडाउनमुळे नाहक सार्वजनिक ठिकाणी फिरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. दिवसभर घरीच राहावे लागत असल्याने लोकांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. याचाच परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत असून, मुंबईकरांनी शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य क्षेत्रातून केले जात आहे.
नोकरदार मंडळी आता वर्क फ्रॉम होम करताना दिसून येत आहेत. परिणामी बैठ्या जीवनशैलीमुळे शारीरिक हालचाल कमी झाली आहे. त्यातच आता लॉकडाउनमुळे घरीच बसून काम करावे लागत असल्याने दिवसभर एकाच जागी बसून राहिल्याने आरोग्याच्या समस्या येत आहेत. लॉकडाउनमुळे प्रत्येक जण घरी बसून काम करण्याच्या विविध पद्धतींचा अवलंब करताना दिसत आहे. आॅफिसला न जाता, क्लायंट मीटिंग न करता, फिल्डवर न जातासुद्धा अनेकांना थकवा जाणवतोय? म्हणजेच लोक एकीकडे वर्क फ्रॉम होम करण्यात यशस्वी होत असताना दुसरीकडे मात्र शारीरिक तंदुरुस्ती राखण्यात अपयशी ठरतायेत. कारण, घरी आॅफिसचे काम करताना अनेक लोक बेड, पलंग किंवा खुर्च्यांवर बसतात. अशा स्थितीत अधिक काळ बसल्याने खांदा आणि मानेवर दबाव येऊन शारीरिक समस्या निर्माण होऊ शकते, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
योगा अतिशय फायदेशीर ठरू शकतो
दिवसभर एकाच जागी बसावे लागते. त्यामुळे हालचालच होत नाही आणि अपचनाचा त्रास होतो. रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे, असे चक्र सुरू झाल्याने खाण्यापिण्याच्या वेळा बदलल्या आहेत. त्यामुळे अनेकांना डोकेदुखीची समस्याही जाणवू शकते. नियमित शारीरिक व्यायाम करणे गरजेचे आहे. पोट, पाठ आणि पायाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी व्यायाम हा उत्तम पर्याय आहे. याशिवाय मन व शरीरावरील ताणतणाव कमी करायचा असल्यास योगा अतिशय फायदेशीर आहे.
- डॉ. अश्विन बोरकर, सल्लागार, न्यूरोसर्जन तज्ज्ञ
पाठीला ताण देऊ नका
कोणतीही वस्तू उचण्यासाठी किंवा झाडण्यासाठी पाठीवर ताण देऊ नका. यामुळे पाठदुखी होऊ शकते.
बराच वेळ एकाच ठिकाणी बसणे टाळा
शारीरिकदृष्ट्या फिट राहायचे असल्यास सतत हालचाल करणे गरजेचे आहे.
त्यामुळे घरातून आॅफिसचे काम करताना अधिक वेळ एकाच ठिकाणी बसून राहू नका.
स्वयंपाकघरात काम करत असतानाही वारंवार चालण्याची सवय करावी.
फोनवर बोलतानाही बसून न बोलता फिरून बोलण्याचा प्रयत्न करावा.
संगणकावर काम करताना खाली झुकणे हानिकारक ठरू शकते.
यामुळे मान, मागच्या बाजूला आणि खांद्याला वेदना होऊ शकते.
याकरता संगणकाची स्क्रीन चेहऱ्यासमोर दिसेल यासाठी त्याखाली पुस्तके लावून ती वर करा.
त्यामुळे आपण संगणकाची स्क्रीन योग्यरीत्या पाहू शकता. जेणेकरून काम करताना खाली वाकल्याने मान व मणक्याला त्रास जाणवणार नाही.
काम करत असताना पलंगावर बसून काम करणे शक्यतो टाळावे. यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.