मुंबई : कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातील सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जात आहे. त्यामुळे आता कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान कराने, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी सुविधा करण्यात आली आहे. नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात प्लाटिना प्रोजेक्ट प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राचे डिजिटल उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. ज्या जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयांची सुविधा नाही तेथे आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी लागणारे यंत्र पुरविले जाणार आहे. हा संकलित केलेला प्लाझ्मा वैद्यकीय महाविद्यालयात पुरविला जाईल. प्लाझ्मा थेरपी उपचार यशस्वीता दर हा ९० टक्के आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतले जाते. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. यामुळे रुग्णाची प्रतिरोधकशक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकते.
प्लाझ्मा कोणाला दिला जातो?प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा, हे डॉक्टर्स ठरवितात. मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषध उपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा रुग्ण निवडला जातो.