coronavirus: चिंताजनक! मुंबईत कोरोनाचा विळखा वाढतोय, धारावी, माहीम, दादरमध्ये प्रादुर्भाव अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 03:38 AM2020-05-13T03:38:07+5:302020-05-13T03:38:57+5:30
दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे बाधित क्षेत्राचा आकडा गेल्या दोन आठवड्यात दोन हजार ६००वर पोहोचला आहे.
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिकेमार्फत अनेक उपाययोजना सुरू आहेत. मात्र काही विभागांमध्ये विशेषत: दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे बाधित क्षेत्राचा आकडा गेल्या दोन आठवड्यात दोन हजार ६००वर पोहोचला आहे. यापैकी जी उत्तर विभागात धारावी, माहीम, दादर परिसरात सर्वाधिक ३७० बाधित क्षेत्र आहेत.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर संबंधित इमारत अथवा चाळीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला जातो. त्या परिसरातील रहिवाशांना बाहेर जाण्यास तसेच बाहेरच्यांना आत येण्यास परवानगी दिली जात नाही. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा चाचणी अहवाल, त्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. मुंबईत ११ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. एप्रिल महिन्यात एक हजार ३६ बाधित क्षेत्र होती. यापैकी २३१ बाधित क्षेत्रांत १४ दिवसांमध्ये एकही रुग्ण आढळून न आल्याने ही क्षेत्र वगळण्यात आली. परिणामी, २७ एप्रिलपर्यंत मुंबईमधील बाधित क्षेत्रांची संख्या ८०५वर आली होती.
मात्र आतापर्यंत मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा १४ हजारांवर गेला आहे. तर ५२८ लोकांचा मृत्यू झाला आहे. या काळात बाधित क्षेत्रांचा आकडाही दोन हजार ६००वर पोहोचला आहे.
बाधित क्षेत्र संख्या
वांद्रे, बेहराम पाडा, खार १६५
देवनार, मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर, चेंबूर १५२
महालक्ष्मी, सातरस्ता, प्रभादेवी, वरळी १४३
अंधेरी, मरोळ, जोगेश्वरी, विलेपार्ले १२०
भोईवाडा, परळ, चिंचपोकळी, नायगाव १०८
घाटकोपर, विक्रोळी पार्कसाइट १०९
गोरेगाव, दिंडोशी, मालाड, कांदिवली इत्यादी १०२
चेंबूर, चेंबूर नाका, टिळकनगर ९७
भांडुप, सोनापूर, कांजूरमार्ग ८९
खेतवाडी, गिरगाव, ग्रँट रोड, ताडदेव ८२
कांदिवली, लालजीपाडा, चारकोप ८१
दादर, माटुंगा, सायन, कोळीवाडा, वडाळा, अँटॉप हिल ७५
गोरेगाव, मालाड ६६
वांद्रे, खार, सांताक्रुझ ५९
बोरीवली, देवीपाडा, कांदिवली ५३
डोंगरी, मस्जिद बंदर, भेंडीबाजार, उमरखाडी ५२
मरीन लाइन्स, काळबादेवी, भुलेश्वर ५१
बाधित क्षेत्र म्हणजे काय?
कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्ण सापडताच सदर व्यक्ती राहत असलेली इमारत, चाळ परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येते. या ठिकाणी आतल्या रहिवाशांना बाहेर जाण्याची परवानगी नाही आणि बाहेरच्या लोकांना आत प्रवेश दिला जात नाही. या परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा सशुल्क पद्धतीने भागविण्यात येत आहेत. पालिकेच्या स्थानिक विभाग कार्यालयामार्फत याबाबत नियोजन केले जात आहे. या परिसरात सर्व संशयित लोकांची चाचणी करून त्यांचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत त्या परिसरात प्रवेशबंदी लागू असते.
मुंबईत ११ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. एप्रिल महिन्यात एक हजार ३६ बाधित क्षेत्र होती. २३१ बाधित क्षेत्रांत नंतर रुग्ण सापडला नाही़