Join us

Coronavirus: चिंताजनक परिस्थिती! देशातील पाच राज्यांत सापडले काेराेनाचे ८० टक्के नवीन रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 3:19 AM

सरकारने कठोर निर्बंधांची प्रक्रिया घेतली हाती 

मुंबई: देशातील पाच राज्यांत काेराेनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, नवीन ८० टक्के रुग्णांची नाेंद झाली आहे.  देशातील सक्रिय रुग्ण वाढण्यामागे महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब या राज्यातील रुग्णसंख्या कारणीभूत आहे. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत या राज्यांतील रुग्णांचे प्रमाण ७६.४८ टक्के इतके आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारसह त्या - त्या ठिकाणचे राज्य सरकारही सतर्क झाले असून, त्यांनी कठोर निर्बंधांची प्रक्रिया हाती घेतली आहे.

देशात दैनंदिन रुग्णसंख्या वाढीस महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांतील संसर्ग कारणीभूत आहे. देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत त्यांचे प्रमाण तब्बल ८०.६३ टक्के इतके आहे. राज्यात सलग दोन दिवस २५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली, तर पंजाबमध्ये २ हजार ३६९, केरळमध्ये १ हजार ८९९ इतके रुग्ण आढळले. सध्या देशात २ लाख ७१ हजार २८२ रुग्ण उपचाराधीन आहेत. सक्रिय रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण महाराष्ट्रात असून, १ मार्च रोजी काेराेना पॉझिटिव्हिटी दर १० टक्के होता तो आता १६ टक्के झाला आहे. राज्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून प्रत्येक दिवशी १ लाख ३८ हजार ९५७ डोस  देण्यात येतात. इतर काही प्रमुख राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण समाधानकारक आहे. मात्र, ते आणखी वाढवावे, असे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. राज्यात आजमितीस ३५ लाख ५२ हजार डोस देण्यात आले असून, ३१ लाख ३८ हजार ४६३ डोस उपलब्ध आहेत.

मुंबईत २१ हजार रुग्ण उपचाराधीनमुंबईत मागील शनिवारी, १३ मार्च रोजी १३ हजार २४७ रुग्ण उपचाराधीन होते. मात्र, मागील आठवडाभरात दैनंदिन रुग्णांमध्ये सातत्याने वाढ झाल्यामुळे आठवडाभरात ८ हजार ८८ रुग्णांची वाढ झाली. मुंबईत सध्या २१ हजार ३३५ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली, तर १३ ते १९ मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.६१ टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ११४ दिवसांवर आला आहे.

मुंबईत शनिवारी पुन्हा २ हजार ९८२ रुग्णांचे निदान झाले असून, ७ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ५८ हजार ८७९ झाली असून, बळींचा आकडा ११ हजार ५७२ झाला आहे. दिवसभरात १ हजार ७८० रुग्ण बरे झाले असून, ३ लाख २५ हजार ६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९१ टक्के झाला आहे. मुंबईतील झोपडपट्टी आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेन्मेंट झोन ३४ असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ३०२ इतकी आहे. मागील २४ तासांत पालिकेतर्फे रुग्णांच्या सहवासातील २० हजार ७२० अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या