मुंबई - महाराष्ट्रातील कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. प्रचंड वेगाने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. (Coronavirus in Maharashtra) रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड आणि साध्या बेडचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्णांना उपचारांसाठी दाखल करण्यामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत ऑक्सिजनची गरज असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाला खुर्चीवर बसवून त्याच्यावर उपचार सुरू करावे लागले. (Worrying situation in Maharashtra, patient has to be put in a chair due to lack of bed)
या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात परिस्थिती खूप वाईट आहे. येथील एका व्हायरल क्लीपमधून दावा करण्यात येत आहे की, बेड संपल्याने रुग्णालयात रुग्णांना खुर्चीवर बसून उपचार घ्यावे लागत आहेत. याशिवाय काही रुग्णांना खुर्चीवर बसवूनच ऑक्सिजन लावावा लागत आहे. तसेच येथे मेडिकल स्टाफचीसुद्धा खूप टंचाई आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहे. रविवारी राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी महाराष्ट्रात ६३ हजार २९४ कोरोनाचे रुग्ण सापडले होते. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ०७ हजार २४५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
महाराष्ट्राप्रमाणे देशातही कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाचे तब्बल १ लाख ६८ हजार ९१२ रुग्ण सापडले आहेत. तर ७५ हजार ८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दिवसभरात ९०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.