coronavirus: यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मंडळांसाठी नियमावली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 03:27 AM2020-05-12T03:27:58+5:302020-05-12T03:30:20+5:30
देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे या वर्षातील सर्व धर्मांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. तसेच अनेक गावच्या जत्रा-यात्रा, मोठमोठे सोहळे रद्द करण्यात आले आहे.
मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा होणारा गणेशोत्सवही दोन महिन्यांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक झाली. यामध्ये त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे.
देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे या वर्षातील सर्व धर्मांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. तसेच अनेक गावच्या जत्रा-यात्रा, मोठमोठे सोहळे रद्द करण्यात आले आहे. अगदी पंढरपूरच्या आषाढी वारीवरही कोरोनाचे संकट आहे. यातच आता गणेशोत्सव येत असल्याने सर्वच गणेशभक्तांना, मूर्तिशाळेतील कलाकारांना चिंता लागली आहे.
यावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्यावतीने एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन समितीने केले आहे. तसेच राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिका यांनी गणेशोत्सवासंदर्भात आपली भूमिका जाहीर करावी, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले.
नियमावली
वर्गणी : मुंबईतील मोठ्या मंडळांनी (आर्थिकदृष्ट्या सक्षम) विभागीय वर्गणी घेऊ नये. मात्र केवळ वर्गणीवर अवलंबून असलेल्या मंडळांची परंपरा खंडित होऊ नये याकरिता या मंडळांनी आपापल्या विभागात स्वेच्छेने वर्गणी देण्याबाबत आवाहन करणे.
श्रीमूर्ती : कोरोनामुळे उद्भवलेली कठीण परिस्थिती पाहता सर्व मंडळांनी शक्यतो मर्यादित उंचीचा आग्रह धरावा. शक्य असल्यास शाडू मूर्तीस प्राधान्य द्यावे .
मंडप/रोषणाई : मंडळांनी मंडप, रोषणाई तसेच डेकोरेशनवर होणारा अतिरिक्त खर्च टाळावा. या खर्चातून आपल्या विभागातील निर्जंतुकीकरण, सुरक्षित वावर नियमावलीसह शक्य तितकी कोरोना प्रतिबंधित व्यवस्था करावी.
आगमन : श्रींच्या आगमनासाठी मूर्तिकाराकडे किमान कार्यकर्त्यांसह जाणे. (मास्क व सॅनिटायझर जवळ बाळगणे) तसेच अतिशय साधेपणाने मूर्ती मंडपात आणणे.
श्रींदर्शन : मंडपाच्या आसपास वावर असणाऱ्या व्यक्तीस (भटजी कार्यकर्ते इ.) हात-पाय स्वच्छ करण्यासाठी वॉश बेसिनची तसेच सुरक्षित वावर राखता येईल, अशी व्यवस्था करणे.
कार्यक्रम : गणेशोत्सवाच्या काळात होणाºया सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याऐवजी या वर्षी स्थानिक यंत्रणांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे .
विसर्जन : आपली सार्वजनिक मूर्ती मर्यादित उंचीची असावी जेणेकरून मंडप परिसरात यंत्रणेच्या सहकार्याने कृत्रिम तलावाची निर्मिती करून तिथेच श्रींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करावी.