Join us

Coronavirus: ‘आप झुठ बोल रहे है दादाजी...!’ नातींनीच पकडली गृहमंत्र्यांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 4:35 AM

दीड महिन्यांनी नातींसोबत संवाद साधताना अनिल देशमुख झाले भावनिक

मुंबई : कोरोनाला हरविण्यासाठी सर्वच स्तरातून उल्लेखनीय उपाययोजना केल्या जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गृहविभाग दिवसरात्र डोळ्यात तेल घालून काम करत आहे. गेली दीड महिना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हेदेखील आपल्या कुटूंबापासून कोसो दूर आहेत. परवा नागपूर दौऱ्यात त्यांच्या नातीने त्यांची ‘चोरी’ पकडली तेव्हा कुटुंबाच्या विरहाने ते चांगलेच भावनिक झाले.

गृहमंत्री देशमुख यांचे सध्या मुंबईतून कामकाज सुरु आहे. त्यांचे ज्येष्ठ पुत्र सलील यांच्या सारा व सारिका या दोन्ही कन्या आहेत. त्या दोघी नागपूरला असतात. नागपूर दौºयावर असतानाच त्यांनी व्हॉटस अ‍ॅपवरुन व्हिडीओ कॉलद्वारे त्यांच्याशी संवाद साधला अन् ते पकडले गेले! नेमके काय घडले याचा किस्सा त्यांनी ‘लोकमत’ला सांगितला. ते म्हणाले, आमच्या नागपूरपर्यंतच्या प्रवासात किमान दहा बैठका झाल्या असतील. तब्बल दीड एक महिन्यांनी मी नागपूरचा दौरा केला. माझ्या नातींना भेटण्याची खूप इच्छा होती. पण भेटणे शक्य नव्हते. म्हणून मी त्यांना व्हिडीओ कॉल केला.माझ्या नातींनी तो व्हिडीओ कॉल घेतला आणि पहिला प्रश्न विचाराला, ‘दादाजी आप कहा पे है?’ मी त्यांना सांगितले, ‘मै तो मुंबईमें हू बेटा’, पण त्या म्हणाल्या, ‘आप झुठ बोल रहे है... आप तो नागपूर के आॅफिस में बेठै है.. आपके पिछे तो आॅफिसवाले फोटो है..!’ माझ्या नातींनी माझे ऑफिस पाहिल्याने त्यांनी लगेच ओळखले की मी मुंबईत नाही तर मी नागपूरमध्ये आहे.मी म्हणालो, ‘तुम्ही बरोबर ओळखले. पण काम असल्याने मला तुम्हाला भेटता येत नाही. पुढच्यावेळी भेटू तेव्हा खाऊबिऊ घेऊन भेटू’ मात्र तरीही ‘भेटायला या’ असा त्यांचा हट्ट सुरुच होता. मी त्यांना सांगितले की ‘मी थोडा धावपळीत आहे...तुम्हाला कोरोना माहीत आहे ना कोरोना... त्या कामात आहे. पुढच्यावेळी येईन तेव्हा खेळणी बिळणी घेऊन येईन!’ एवढे बोलून मी त्यांची कशीबशी समजूत काढली खरी, परंतु थोडे का होईना आम्ही भावनाविवश झालो होतो. कारण नागपूरला जावून देखील घरी जावू शकलो नाही.

टॅग्स :अनिल देशमुख