मुंबई - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या देविदास जयसिंग राठोड यांनी कार्यतत्परता आणि कर्तव्याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. कोरोना संकटाच्या काळात, अत्यावश्यक सेवा बजावणाचं काम देविदास यांच्याकडे आहे. आपल्या ड्युटीवर जाण्यासाठी देविदास यांना सध्या २१ किमीची पायपीट करावी लागत आहे. मुंबई शहरापासून १०० किमी अंतरावरील मनोर या गावी ते आपल्या कुटुंबासह राहतात. मात्र, सध्या लॉकडाऊन असल्याने ते कर्तव्यावर हजर होण्यासाठी चक्क २१ किमीचा पायी प्रवास करतात. जर कुणी लिफ्ट दिली, तर थोडासा आराम त्यांना मिळतो.
देविदास हे सध्या पालघर येथून सेंट्रल मुंबई डेपोमध्ये बसची वाहतूक करत आहेत. मुंबईतील केईएम रुग्णालयात २५ डॉक्टर आणि नर्स यांना पोहचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या जबाबदारीच्या पूर्तीसाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत असून ते आपलं कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. आपल्या मनोर गावातील घरापासून ते पाण्याच्या दोन-तीन बाटल्या घेऊन पायी पालघरच्या दिशने निघतात. वाटेत अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या ट्रक्सना हात करुन लिफ्ट मागतात. एसटी महामंडळात आपण वाहक असून अत्यावश्यक सेवा देण्याची जबाबदारी माझ्यावरही असल्याचं पास दाखवून ते ट्रक ड्रायव्हरला सांगतात. त्यानंतर, ट्रक ड्रायव्हर पालघरपर्यंत त्यांना आपल्या वाहनातून सोडतता. देविदास यांचा हा दिनक्रम सुरूच आहे. मात्र, रविवारी तब्बल २१ किमीपर्यंतचा पायी प्रवास या वाहकाला करावा लागला. कारण, रविवारी बऱ्यापैकी ट्रक चालकांनी सुट्टी घेतली होती. त्यामुळे देविदास यांना पालघर गाठण्यासाठी चक्क २१ किमी धावत जावे लागले. आपल्या ड्युटीवर राईट टाईम पोहोचण्यासाठी त्यांनी चक्क स्वत:सोबतच मॅरेथॉन सुरु केली अन् ती जिंकलीही.
डॉक्टर आणि नर्सेस हे माझे दैनंदिन प्रवासी आहे, कोरोनाविरुद्धच्या लढाईत ते आपलं महत्वाचं योगदान देत आहेत. मग, मी त्यांना असं सोडू शकत नाही, असे राठोड यांनी म्हटले. विशेष म्हणजे त्यांना पूर्वीपासूनच धावायची आवड आहे, म्हणूनच आपल्या डयुटीवर जाण्यापूर्वी ते दररोज सकाळी रनिंग करतात. या आवडीतूनच त्यांनी कित्येक मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. राठोड यांच्या कर्तव्यदक्षतेचं पालघर बस डेपोचे मॅनेजर नितीन चव्हाण यांनीही लहानसा कार्यक्रम घेऊन कौतुक केलं. सध्या दररोज सकाळी ६ वाजता पालघर येथील आपल्या डेपोत ते ड्युटीसाठी हजर राहतात. त्यानंतर, दुपारी ३ वाजता दादर येथून बस घेऊन पालघरला सायंकाळी ५ वाजता पोहोचतात. त्यानंतर, त्यांचा पुढील मनोर येथे २१ किमीचा प्रवास सुरु होतो.
राठोड यांना ४ मुले असून सचिन २९, प्रियंका २७, अर्चना २५ आणि दिपक (२१) आणि पत्नी हे त्यांचं कुटुंब आहे. त्यापैकी प्रियंका ही वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेत असून अर्चना ही वकोला येथे नर्स आहे. सचिन सिक्युरिटी गार्डचे काम करतो, तर दिपक प्रिंटीगचे शिक्षण घेत आहे.