मुंबई : मास्क न लावता बाहेर पडलेल्या तरुणाला हटकल्याच्या रागात पोलिसावर विटेने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी काळबादेवी परिसरात घडली. यात सहायक फौजदार जखमी झाला असून एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरळी परिसरात राहणारे रमेश पवार (५१) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेएसएस रोड परिसरात बंदोबस्ताला असताना त्यांना दुपारी साडेबाराच्या सुमारास एक तरुण मास्क न लावता रस्त्यावर फिरताना दिसला. त्याला थांबवून कोरोनाबाबत सांगताच त्याने थेट पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अडवताच त्याने रस्त्यावरील पडलेल्या विटेने हल्ला चढविला. यात सहायक फौजदार आढाव यांच्या डोळ्याला दुखापत झाली.संबंधित तरुणाला ताब्यात घेत, अटकेची कारवाई करण्यात आली. मोहम्मद शरिफ मो. शफिक पठाण (४२) असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा असून काळबादेवी येथील फुटपाथवर राहतो. दरम्यान, राज्यभरात पोलिसांवरील हल्ल्यांचे १०२ गुन्हे दाखल असून १६२ जणांना अटक करण्यात आले आहे.
CoronaVirus: तरुणाला हटकल्याच्या रागात पोलिसांवर केला विटेने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 1:11 AM