Coronavirus: मास्कवर शिवरायांचा फोटो; शिवप्रेमींकडून संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 08:33 PM2020-03-16T20:33:20+5:302020-03-16T20:38:44+5:30
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी विविध मास्क वापरले जात आहे.
मुंबई: राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 38 जण रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाश यांसारख्या वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मास्क, सॅनेटायझर यांसारख्या वस्तूंची विक्री देखील चढ्या दराने होत आहे. मात्र आता कोरोनासाठी वापरणाऱ्या मास्कवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो छापण्यात आल्याचे आढळून आले आहे.
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी विविध मास्क वापरले जात आहे. परंतु एका मास्कचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या फोटोमधील मास्कवर शिवाजी महाराज यांचा फोटो असून बाजूला जगदंब असं लिहिण्यात आले आहे. या मास्कचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ज्याच्यावर महाराजांचा फोटो आहे अशा प्रकारचे मास्क विकत घेऊ नका असे आवाहन देखील शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिकल दुकानदारांकडून ग्राहकांची लुट होत आहे. मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाश या वस्तुंची चढ्या दराने विक्री केली जात असून याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मेडिकल दुकानदाराशी वाद न घालता, किंवा त्यांची सक्ती न जुमानता आपण संबंधित सरकारी यंत्रणांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 39 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यासाठी पुढील 15 ते 20 दिवस महत्वाचे आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, अनावश्यक प्रवास टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.