Coronavirus: देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रातच, गृहमंत्र्यांनी व्यक्त केला कोरोनामुक्तीचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 05:10 PM2020-04-09T17:10:40+5:302020-04-09T17:11:18+5:30
देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे, यावरुन काहीजण राज्य सरकारवर टीका करत आहे. मात्र, देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या होण्याचे प्रमाणही महाराष्ट्रातच असल्याचे सांगत
मुंबई - तबलिगी जमातच्या निझामुद्दीनमधील मरकजवरुन पुन्हा एकदा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रावर निशाणा साधला. तबलिगी जमातच्या मरकजमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत ३५ टक्क्यांनी वाढ झाल्याचं खुद्द केंद्राचं आरोग्य मंत्रालय सांगतंय. दिल्ली पोलिसांनी तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानशी कशी दिली? त्यामुळे निर्माण झालेल्या संकटाला जबाबदार कोण?, असे प्रश्न उपस्थित करत देशमुख यांनी अमित शहांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर, आता महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीवरुन देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलंय.
देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे, यावरुन काहीजण राज्य सरकारवर टीका करत आहे. मात्र, देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या होण्याचे प्रमाणही महाराष्ट्रातच असल्याचे सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टीकाकारांना नाव न घेता प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्रातील कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा १२०० पार झाला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत असून पुढील ३ ते ४ दिवसांत हा आकडा ३ ते ४ हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावरुन विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, आता सरकाराच्या बचावासाठी खुद्द होम मिनिस्टरच मैदानात उतरले आहेत.
महाराष्ट्र देशातल्या कोणत्याही राज्यांपेक्षा अधिक (२५,७५३) लोकांच्या वैद्यकीय चाचणी करत आहे. याची सरासरी १६५/दशलक्ष आहे, जी बाकी भारतात केवळ ९५/दशलक्षची आहे. एकूण चाचण्यांपैकी ४.४१% पॉज़ीटीव्ह केसेस आहेत.
हे आशादायी असलं तरी सावधानता आहे तशी ठेऊ व कोरोना-मुक्त होऊ., असे ट्विट देशमुख यांनी केले आहे. तसेच, या ट्विटसोबत त्यांनी एक तक्ताही दिला आहे.
महाराष्ट्र देशातल्या कोणत्याही राज्यांपेक्षा अधिक
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 9, 2020
(२५,७५३) लोकांच्या वैद्यकीय चाचणी करत आहे. याची सरासरी १६५/दशलक्ष आहे जी बाकी भारतात केवळ ९५/दशलक्षची आहे.
एकूण चाचण्यांपैकी ४.४१% पॉज़ीटीव केसेस आहेत.
हे आशादायी असलं तरी सावधानता आहे तशी ठेऊ व कोरोना-मुक्त होऊ. pic.twitter.com/CdTOg9rdPf
दरम्यान, लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राला बराच फायदा झाल्याचं मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशींनी यांनी सांगितलं. लॉकडाऊन नसता, तर दर दहा लाखांमागे ६०० ते ७०० रुग्ण आढळले असते. मुंबईत कोरोना चाचण्या होण्याचं प्रमाण अधिक असल्यानंच रुग्णांची संख्या जास्त दिसत असल्याचं परदेशी यांनी आकडेवारीसह सांगितलं. दिल्लीची लोकसंख्या दीड कोटी इतकी आहे. त्यांनी ५५०० चाचण्या केल्या आहेत. आपण १२ हजार चाचण्या केल्या आहेत. दहा लाख लोकसंख्येमागे आपण ८८४ तपासण्या केल्या आहेत. दिल्लीत हेच प्रमाण १९२ इतकं आहे. त्यामुळेच मुंबईतील रुग्णसंख्या अधिक असल्याचं आयुक्तांनी म्हटलं.