मुंबई – राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २ हजारांच्या वर पोहचला आहे. तर १५० हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे.
राज्यातील लॉकडाऊन वाढवल्यामुळे पोलिसांवरचा ताणही वाढला आहे. या संकटकाळात पोलीस कर्मचारी दिवसरात्र जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर उभं राहून सेवा करत आहे. देशावर आणि राज्यावर आलेलं संकट प्रामाणिकपणे दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत आहात. राज्यात असणारे डॉक्टर, सफाई कामगार, पोलीस, दुकानदार अत्यंत प्रामाणिक काम करत आहेत. पण दुर्दैवाने पोलिसांना दोन हफ्त्यात पगार मिळणार होता मात्र पहिला हफ्त्त्यातला पगार पोलिसांना मिळाला नाही. एक तारखेला पहिला हफ्ता मिळणार तर दुसरा १५ तारखेला मिळणार होता. काही जणांना अद्याप पगार मिळाला नाही अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
त्यामुळे सैन्य उपाशीपोटी लढू शकत नाही. विदर्भ, मराठवाड्यातील काही कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना ताबडतोब पगार देणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. राजकारण करायचं नाही तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहात पण पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांचा पगार प्राधान्याने व्हायला हवा. त्यांना पगार देण्याची व्यवस्था करावी. शरद पवार, सोनिया गांधी वेळ पडली तर पंतप्रधानांशीही मुख्यमंत्र्यांनी बोलावं पण या लोकांचा पगार तातडीने द्यावा अशी मागणी मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
दरम्यान, कोरोनामुळे राज्याची अर्थव्यवस्थाही पुरती कोलमडली आहे. राज्यात हातावर पोट असणाऱ्या मजुरांची संख्या जास्त असून, लॉकडाऊनमुळे त्यांच्याकडे काम नाही. काही दिवसांपूर्वीच सरकारनं तिजोरीचा अंदाजे वेतनाचे टप्पेसुद्धा ठरवलेले होते. त्यानुसारच आमदारांना पगार दिला जाणार आहे. जनतेच्या कामासाठी मतदारसंघात फिरणाऱ्या आमदारांनाही लॉकडाऊनमुळे घरीच बसावं लागतंय. लॉकडाऊनमुळे सरकारला हजारो कोटींचा बसलेला असून, केंद्र सरकार १४ एप्रिलनंतर काय निर्णय घेते, याकडे राज्य सरकारे डोळा लावून बसलेली आहे.