मुंबई: कोरोनाविरुद्धच्या लढाईत सेलिब्रिटींपासून सामान्य लोकांपर्यंत सर्वच जण आपापल्यापरीने मदतीचा हात पुढे करत आहेत. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने आपले चार मजली वैयक्तिक कार्यालय महानगरपालिकेला विलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी खुले करून दिले होते. तसेच आता कोरोनाशी दोन हात करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी २५ हजार पीपीई किट्स राज्य सरकारला दिल्याने सर्वस्तरावरुन शाहरुख खानचे कौतुक करण्यात येत आहे. शाहरुख खानने केलेल्या या महत्वपूर्ण योगदानाचे कौतुक मनसेने देखील केले आहे.
मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी ट्विट करुन म्हणाले की, प्रिय शाहरुख तू फक्त सिनेमातला बादशाह नाहीस, खरोखरचा बादशाह आहेस. कोरोनाच्या लढाईसाठी तब्बल २५ हजार PPE किट्स देऊन आम्हा सर्वांची मनं पुन्हा एकदा जिंकलीस. तू दिलेले PPE किट्स परिधान करून डॉक्टर, नर्सेस कोरोनाविरोधात प्राणपणाने लढतील असं कीर्तिकुमार शिंदे यांनी सांगितले आहे.
शाहरुख खानने २५ हजार पीपीई किट्सची मदत केल्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन आभार मानले आहेत.
शाहरुख खानने याआधी पंतप्रधान सहाय्यता निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच अनेक शासकीय, वैद्यकीय संस्थांना आपल्या विविध भागीदारी कंपन्यांद्वारे मदत केली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आर्थिक मदतीसोबतच जागेची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर लागणार हे जाणून आपले ४ मजली वैयक्तिक कार्यालय महापालिकेसाठी खुले करून दिले आहे. या ठिकाणी महापालिकेला मुले, महिला आणि वयोवृद्धांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यास मदत होणार आहे.