- मनोहर कुंभेजकर
मुंबई- कोरोनाच्या टेस्ट किंवा जी हॉस्पिटल निश्चित केली आहेत ती सर्व मुंबई शहरातील आहेत.शहराची लोकसंख्या सुमारे 40 लाख आहे.तर वांद्रे अंधेरी दहिसर मुलुंड पश्चिम उपनगरातील लोकसंख्या 65 लाख आहे.त्यामुळे उपनगरातील नागरिकांसाठी वेगळी व्यवस्था तात्काळ आवश्यक आहे.त्यामुळे उपनरात कोरोना टेस्टची सुविधा सुरू करा अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेल पाठवून केली आहे.
कोरोना टेस्ट कमाल साडेचार हजार (4500) रुपये आपण सांगितले आहे. घरात एकाला सर्दी ताप आला तर भीतीने सर्व जण टेस्ट करणार. घरात चार-पाच जण असतात .एका घरातून रुपये 25000 कसे देणार ? असा सवाल त्यांनी केला.बोरिवली पश्चिम येथे मुंबई महापालिकेचे भगवती रुग्णालय नवीन बांधून तयार आहे. त्यात सर्दी तापाच्या ओपीडी शिवाय काहीच होत नाही .
पंधरा-सोळा मजल्यांची इमारत मोकळी आहे तिच्यात आपण कोरोनासाठी उपचार चालू करू शकता. रुस्तमजी दहिसर पश्चिम च्या बाजूला मुंबई महापालिकेच्या प्रस्तुती गृहासाठी बांधलेली शंभर खाटांची इमारत बंद अवस्थेत पडलेली आहे. तिचा उपयोग विलगीकरण करण्यासाठी त्वरित करता येईल असे मत धनंजय जुन्नरकर यांनी व्यक्त केले.
मुंबई महापालिकेने प्रत्येक प्रभागाला कोरोना साठी काही डॉक्टरांची नियुक्ती केली आहे.प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या पन्नास हजाराच्या आसपास असून मुंबईत 227 प्रभाग आहेत .मात्र काही प्रभागात 1 डॉक्टर तर काही ठिकाणी 3 डॉक्टर अशी असमान विभागणी केली आहे.तेथे कृपया समान संख्येत डॉक्टर नेमण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली.
मुंबईत ६० टक्के नागरिक झोपडपट्टीत राहत असल्याने जास्त आजाराचा धोका आहे.त्यांच्यासाठी स्वतंत्र डॉक्टर नेमण्यात यावेत. तसेच खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉकटर्स यांच्यावर देखिल कोरोना तपासणीची जबाबदारी देण्यात यावी अश्या सूचना देखिल त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केल्याची माहिती धनंजय जुन्नरकर यांनी शेवटी दिली.