नगरसेविका राजुल पटेल तब्बल ७ वर्षांनी घालणार पायात चप्पल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 02:47 AM2019-12-22T02:47:06+5:302019-12-22T02:47:22+5:30
राजुल पटेल यांनी १७ नोव्हेंबर २०१२ रोजी केलेली प्रतिज्ञा आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मनोहर कुंभेजकर
मुंबई : शिवसेनेचा मुख्यमंत्री जोपर्यंत या महाराष्ट्रात होत नाही, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही, अशी शिवसेनेच्या महिला विभागसंघटक व पालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका राजुल पटेल यांची सात वर्षांपासूनची प्रतिज्ञा आता पूर्ण होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा झाला नाही ही खंत त्यांच्या मनात होती. त्यांनी स्वत: निश्चय केला की, जोपर्यंत या महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत आपण पायात चप्पल घालणार नाही. गेली सात वर्षे अनवाणी फिरणाऱ्या राजुल पटेल यांना अनेक जणांनी त्यांच्या या प्रतिज्ञेपासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यांनी आपली प्रतिज्ञा मोडली नाही, अशी माहिती शिवसेनेचे वर्सोवा विधानसभेचे उपविभागप्रमुख राजेश शेट्ये यांनी दिली.
राजुल पटेल यांनी १७ नोव्हेंबर २०१२ रोजी केलेली प्रतिज्ञा आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पूर्णत्वास आली. आता २७ डिसेंबर रोजी शिवसेनेच्या ५१ महिला पदाधिकाऱ्यांसमवेत आदिमायाशक्ती कोल्हापूरची महालक्ष्मी माता, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता आणि वणी (नाशिक) येथील सप्तशृंगी माता या साडेतीन शक्तिपीठांचे त्या दर्शन घेणार आहेत. आमदार अनिल परब यांचा येत्या ३१ डिसेंबरला वाढदिवस आहे. या दिनाचे औचित्य साधत मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजुल पटेल पायात चप्पल घालून ही प्रतिज्ञा पूर्ण करतील.