करी रोडचे ऐतिहासिक कामगार मैदान बळकावले; कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या वाहनांनी केले अतिक्रमण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 06:43 IST2025-04-08T06:42:50+5:302025-04-08T06:43:10+5:30
या मैदानाच्या चारही बाजूंनी अतिक्रमण सुरू झाले आहे. मैदानात अनधिकृतपणे वाहने उभी करण्यात येत आहेत.

करी रोडचे ऐतिहासिक कामगार मैदान बळकावले; कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या वाहनांनी केले अतिक्रमण
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दक्षिण मुंबईतील महापालिकेच्या जी दक्षिण विभागांतर्गत येणाऱ्या करी रोड येथील ऐतिहासिक कामगार मैदान वाहन चालकांनी अनधिकृतपणे पार्किंग करत बळकावले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि खेळाडूंची मोठी अडचण झाली आहे. या ठिकाणी असलेल्या उद्यानाचीही दुरवस्था झाली असून याबाबत महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. परंतु स्थानिकांकडूनच त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
करीरोड येथील ना. म. जोशी मार्गावरील कामगार मैदान ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे. एकेकाळी कामगारांच्या विविध संघटनांच्या जाहीर सभांचे ते हक्काचे ठिकाण मानले जात होते. या मैदानात कामगार आघाडी, बॉम्बे लेबर युनियन यांसारख्या संघटनांचे मेळावे व्हायचे. आता मात्र या मैदानाच्या चारही बाजूंनी अतिक्रमण सुरू झाले आहे. मैदानात अनधिकृतपणे वाहने उभी करण्यात येत आहेत. यामुळे मैदान शिल्लक राहिले नसून केवळ पार्किंग स्थळ अशीच मैदानाची ओळख झाली आहे.
उद्यानाचीही दुरवस्था, भिकाऱ्यांचाही वावर अधिक
रेल्वे स्थानकाला लागूनच या मैदानात छोटेसे उद्यानही विकसीत करण्यात आले होते. मात्र या उद्यानाचीही आता दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी भिकारी आणि गर्दुल्ले यांचाच वावर अधिक दिसतो. मुलांसाठी असलेले खेळाचे साहित्यसुद्धा मोडक्यातोडक्या अवस्थेत आहे. त्याकडे लक्ष देण्यास कुणालाच वेळ नाही.
कामगार मैदान हे मुलांना खेळण्यासाठी तसेच गणेशोत्सवासाठी अत्यंत हक्काचे ठिकाण होते. या ठिकाणी आता आजूबाजूच्या कॉर्पोरेट कार्यालयांतील लोकांची वाहने तसेच अनेक दुचाकी अनधिकृतपणे उभ्या केल्या जातात. त्यामुळे स्थानिक मुलांना खेळण्यासाठी थोडीही जागा शिल्लक नाही. याबाबत महापालिका प्रशासनाला आम्ही वारंवार सांगूनही कारवाई होत नाही. तसेच संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या हक्काचे ठिकाण असलेले उद्यानही सुस्थितीत नाही.
दीपक आजगेकर, स्थानिक नागरिक
आम्ही अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, अनेक वाहने स्थानिकांची असतात. पार्किंगसाठी जागा नसल्याने वाहने उभी केली जातात. कारवाईला स्थानिकांचा नेहमी विरोध होतो. त्यासाठी आम्ही दुसरे पार्किंग स्थळ करण्याच्या विचारात आहोत. लगतच्या उद्यानाचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे. या ठिकाणी व्यायाम, खेळासाठी आवश्यक असणारी उपकरणे लवकरच लावण्यात येणार आहेत.
अविनाश यादव, सहायक उद्यान अधीक्षक, जी- दक्षिण विभाग