कचरा वेगळा करणारी यंत्रणा पालिकेकडे नाही
By admin | Published: May 2, 2015 10:50 PM2015-05-02T22:50:06+5:302015-05-02T22:50:06+5:30
ठाणे महापालिकेला अद्यापही स्वत:चे डम्पिंग नसताना केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील सोसायटीवाल्यांकडून ओला,
अजित मांडके, ठाणे
ठाणे महापालिकेला अद्यापही स्वत:चे डम्पिंग नसताना केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील सोसायटीवाल्यांकडून ओला, सुका कचरा वेगळा करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. याला शहरातील २५ सोसायट्यांनी प्रतिसाद दिला असून त्यांच्याकडून हा कचरा जरी वेगळा करून दिला जात असला तरी पालिकेच्या ठेकेदाराकडे असलेल्या घंटागाड्यांमध्ये तशी सुविधाच नाही. विशेष म्हणजे पालिकेकडे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तंत्रज्ञान अद्यापही उपलब्ध नाही. त्यामुळे जमा झालेला कचरा हा थेट दिव्यातील डम्पिंगवर एकत्रच टाकला जात असल्याची बाब समोर आली आहे.
ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला ६५० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. सध्या हा कचरा दिव्यातील एका खाजगी जागेवर टाकला जात आहे. तसेच आता पालिकेने तळोजा येथील सामायिक भरावभूमीत सहभागी होण्यासाठी पावले उचलली आहेत. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे काही सोसायट्यांनी आवारात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची हमी दिली आहे. परंतु, जमा होणारा हा कचरा घंटागाडीला एकच कप्पा असल्याने तो एकत्रच जमा होत आहे. त्यानंतर, वागळे येथील ट्रान्सपोर्ट स्टेशनमध्ये एकत्र टाकून पुढे तो दिव्यातील डम्पिंगवर डम्प केला जात आहे.
विशेष म्हणजे शीळच्या जागेचा दावा पालिकेकडून केला जात असला तरी वन विभागाची ही जागा अद्यापही पालिकेच्या हाती आलेली नाही.