Join us  

शेतमजूर, वाहनचालक, ऊसतोड कामगारांसाठी वर्षभरात महामंडळ - हसन मुश्रीफ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 12:44 PM

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवनात मंगळवारी ३४ वा ‘गुणवंत कामगार पुरस्कार’ वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात मुश्रीफ बोलत होते.

मुंबई : नव्या केंद्रीय कामगार कायद्यांमुळे ‘कामगार’ ही संकल्पनाच मोडीत निघाली आहे. राज्यात त्यांची अंमलबजावणी करताना कामगार हिताला बाधा पोहोचणार नाही, याची काळजी घेऊ. शिवाय येत्या वर्षभरात शेतमजूर, वाहनचालक, यंत्रमागधारक, ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ स्थापन करून असंघटित कामगारांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणू, अशी ग्वाही ग्राम विकास तथा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दिली.महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवनात मंगळवारी ३४ वा ‘गुणवंत कामगार पुरस्कार’ वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात मुश्रीफ बोलत होते. ते म्हणाले की, अलीकडे संघटित क्षेत्रात कंत्राटी कामगारांची भरती मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्यांना नियमित केले जात नाही, किमान वेतन दिले जात नाही, अशा अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. मात्र, एखाद्या कामगाराने ठराविक वर्षे कंत्राटी पद्धतीने काम केल्यानंतर त्याला कायमस्वरूपी सेवेत घेतले जावे, यासाठी कठोर कायदे करून त्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे. संघटित कामगार कंत्राटी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी राज्य शासन पावले उचलत असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.राज्यात ४ कोटींहून अधिक असंघटित कामगार आहेत. त्यांना कामगार म्हणून कोणतेही विशेष लाभ मिळत नाहीत. या सर्व असंघटित कामगारांच्या जीवनात चांगले दिवस आणण्याची जबाबदारी कामगार विभागाची आहे. याआधी माथाडी, सुरक्षारक्षक, बांधकाम मजूर, घरेलू कामगारांसाठी महामंडळे स्थापन केली; उर्वरित घटकांसाठी महामंडळे स्थापन करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने पावले उचलली आहेत. येत्या वर्षभरात शेतमजूर, यंत्रमागधारक, ऊसतोड कामगारांचे महामंडळ करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पुरस्कारप्राप्त कामगारकिरण जाधव (हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ), राजेश वर्तक (टाटा स्टील लिमिटेड, तारापूर), विलास म्हात्रे (नवी मुंबई महापालिका, परिवहन उपक्रम), तानाजी निकम (कॅनरा बँक, घाटकोपर), अविनाश दौंड (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, चर्नी रोड), विनोद विचारे (भारतीय स्टेट बँक, लालबाग), संपत तावरे (महानंद दुग्धशाळा, गोरेगाव), सखाराम इंदोरे (गोदरेज अँड बॉईज कं.लि., विक्रोळी), वैभव भोईर (ठाणे महापालिका परिवहन सेवा), राम सारंग (माझगांव डॉक शिप बिल्डर्स लि.) अजय दळवी (सिम्बोलिक फॅब्रिक प्रा.लि., भिवंडी), जयवंत कुपटे (भारत बिजली लि., ऐरोली), चंद्रकांत मोरे (बँक ऑफ महाराष्ट्र, परळ शाखा), संजय तावडे (मुंबई पोर्ट ट्रस्ट)

पुरस्कार विजेतेहाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाला ‘रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार -२०१९’ देण्यात आला, तर कामगारभूषण पुरस्कारासाठी राजेंद्र हिरामण वाघ यांची निवड करण्यात आली. याशिवाय ५१ जणांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्काराने गौरविण्यात आले.

उन्हातान्हात दिवसरात्र मेहनत करणाऱ्या कामगारांच्या हाती अगदी तुटपुंजी रोजंदारी पडते. सर्वप्रथम ही विषमतेची दरी दूर करण्याची गरज आहे. कारण कामगारांचे हात थांबले, तर देश थांबेल. आपल्याकडे जातीच्या आधारावर अनेक योजना आणल्या जातात; पण कष्टकरी समाजाला चांगले दिवस दाखवायचे असतील तर श्रमावर आधारित योजना आणायला हव्यात.- बच्चू कडू, कामगार राज्यमंत्री  

टॅग्स :हसन मुश्रीफशेतकरी