भटक्या श्वानांना पालिका देणार ‘डोस’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 03:07 PM2020-12-03T15:07:40+5:302020-12-03T15:08:00+5:30
stray dogs : एका श्वानामागे ६८० रुपये खर्च
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात भटक्या श्वानांची संख्या वाढत असून, भटक्या श्वानांकडून दंश होण्याच्या घटनादेखील घडत आहेत. परिणामी अशा घटनांतून बाधा होऊ नये आणि भटक्या श्वानांची संख्या वाढू नये म्हणून मुंबई महापालिकेने आता कंबर कसली आहे. त्यानुसार, मुंबई महापालिका भटक्या श्वानांना पकडून निर्बीजीकरण, रेबीज लसीकरण करणार आहे. वर्षाला ३२ हजार श्वानांचे लसीकरण केले जाणार असून, एका श्वानामागे ६८० रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुंबई महापालिकेची स्थायी समितीची बैठक शुक्रवारी होणार असून, या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव दाखल होणार आहे. त्यानुसार, मुंबई महापालिका भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी मनुष्यबळासह सात परिमंडळात सात वाहने उपलब्ध करून देणार आहे. याद्वारे भटक्या श्वानांना पकडून निर्बीजीकरण, रेबीज लसीकरण करण्यात येईल. परिणामी भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात येण्यास मदत होणार असून, एका भटक्या श्वानासाठी ६८० रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुंबई महापालिका भटक्या श्वानांना पकडते. त्यांचे लसीकरण करते आणि पुन्हा त्यांना त्यांच्या परिसरात सोडते. जेव्हा २०१४ मध्ये श्वानांची गणना करण्यात आली तेव्हा ९५ हजार १७४ भटक्या श्वानांपैकी २५ हजार ९३५ भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यात आले नव्हते. मुंबई महापालिका वर्षाला ३० टक्के भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यासाठी उपाय करत असून, नव्या ७ वाहनांचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मांडला जाणार आहे. एका वर्षाला ३२ हजार भटक्या श्वानांचे लसीकरण केले जाईल. पालिकेच्या श्वान नियंत्रण विभागात ५० टक्के पदे रिक्त आहेत. आता ४ वाहनांमार्फत भटक्या श्वानांच्या लसीकरणाचे काम केले जाणार आहे. परिणामी सात परिमंडळात प्रत्येकी एक वाहन वाढविले जाणार आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या या कार्यक्रमामुळे श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात यश येईल, असा आशावाद व्यक्त केला जात असून, श्वान दंशावरदेखील नियंत्रण मिळविता येईल, असा दावा केला जात आहे.