मनोहर कुंभेजकर
मुंबई: पश्चिम उपनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांवर 30 टक्के वाढलेले अनधिकृत फेरीवाले कारणीभूत असून या फेरीवाल्यांवर पालिका मेहरबान असल्याची टिका राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी लोकमतशी बोलतांना केली. पश्चिम उपनगरातील अंधेरी ते बोरिवलीच्या पट्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते.यावर डॉ.दीपक सावंत यांनी भाष्य केले.
पश्चिम उपनगरात अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या 30 टाक्यांनी वाढली आहे.फेरीवाल्यांवर कारवाई करण्यापूर्वी त्यांना पालिकेचे संबधीत अधिकारी कारवाई करणार असल्याचे सूचीत करतात, मग थातुरमातुर कारवाई केली जाते. जर रस्त्याच्या डाव्या बाजूकडे बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करतांना,रस्त्याच्या उजव्या बाजूला बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिका प्रशासनाकडून काना डोळा केला जातो.विशेष म्हणजे अनेक फेरीवाले हे मास्क घालत नसून सर्रास विक्री करतात असे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. पालिका प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई करून त्यांचे समानच जप्त केले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. रस्तावर फिरतांना नागरिक मास्क लावत नाही आणि सॊशल डिस्टनसिंग पाळत नाही. पालिका प्रशासन मास्क लावत नसलेल्या नागरिकांवर पालिका प्रशासन जरी कारवाई करत असले तरी अजून अधिक जोमाने कारवाई झाली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना खरोखरीच स्तुत्य असून यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव निश्चित कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सदर संकल्पना पालिका प्रशासन व शिवसेनेचे लोकप्रतिनिधी चांगल्या प्रकारे राबवत आहे. या मोहिमेत इतर राजकीय पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून सहकार्य करणे गरजेचे आहे. मात्र ज्या ठिकाणी प्रतिसाद कमी मिळत आहे त्याठिकाणी शिवसैनिकांचे मनुष्यबळ वाढवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सर्वांच्या सहकार्याने आपण कोरोनावर निश्चित मात करू शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.