मुंबई : गरीब आणि गरजू लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी मुंबई महापालिका शहरात १० सुविधा केंद्र उभारणार आहे. पालिकेने त्यासाठी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि जे. एस. डब्लू. या कंपन्यांसोबत करार केला आहे. या सुविधा केंद्राच्या माध्यमातून सुमारे २ लाख लोकांना १ रुपया प्रति लिटर दराने पाणी उपलब्ध होणार आहे.
सर्वांनाच पाणी मिळावे, यासाठी पालिकेचे प्रयत्न आहेत. ही गरज भागविण्यासाठी पालिकेने जेएसडब्लू, एचयुएल कंपनीसोबत करार केला आहे. सार्वजनिक-खासगी-भागीदारी या तत्वावर हा प्रकल्प मुंबईत राबविण्यात येणार असून, महिन्याला १५० रुपये दराने कुटुंबीयांना पाणी मिळणार आहे. या १० केंद्रांची नेमकी जागा अद्याप निश्चित झालेली नसली तरी शहरातील ८ वॉर्डांमध्ये सुविधा केंद्र बांधण्यात येणार आहेत. ही केंद्र सौरउर्जेवर काम करणार असून, दहा वर्षांत सुमारे ३०० दशलक्ष लिटर पाण्याची बचत यामुळे होणार आहे. १२ सुविधा केंद्र आधीपासूनच कार्यरत असून, हा प्रकल्प मुंबईकरांना सोयीस्कर ठरणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
इथे आहेत १२ सुविधा केंद्र मुंबई महापालिकेने २०१६ साली एचयुएल आणि एचएसबीसी या कंपन्यांसोबत आधीच करार केला होता. त्यानुसार मुंबईतील धारावी, गोवंडी, घाटकोपर, अंधेरी, मालाड आणि कुर्ला यासह अन्य ठिकाणी १२ सुविधा केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. या सुविधा केंद्रांमार्फत दरवर्षी ३ लाख नागरिकांची पाण्याची सोय होत आहे.