खासगी सुरक्षा रक्षकांसाठी पालिका मोजणार नऊ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:06 AM2021-09-24T04:06:28+5:302021-09-24T04:06:28+5:30
मुंबई : कोरोनाच्या काळात रेल्वे स्थानक, विमानतळ व कोविड केंद्रांमध्ये खासगी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. यासाठी पालिका ...
मुंबई : कोरोनाच्या काळात रेल्वे स्थानक, विमानतळ व कोविड केंद्रांमध्ये खासगी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. यासाठी पालिका प्रशासन नऊ कोटी रुपये खर्च करणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, दादर मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानक, वांद्रे टर्मिनस आणि बोरीवली रेल्वे स्थानकावर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात होती. त्यासाठी सुरक्षा रक्षकांची फौज त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. ईगल सिक्युरिटी या कंपनीकडून हे सुरक्षा रक्षक पुरविण्यात आले होते. नोव्हेंबर २०२० ते जून २०२१ या सात महिन्यांसाठी या सात ठिकाणी दीडशे सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणी तैनात सुरक्षेसाठी पालिकेने १८ हजार ७६१ रुपये खर्च केले आहेत. एकूण दोन कोटी दोन लाख रुपये शुल्क पालिका देणार आहे.
या सात रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा पुरविण्याबरोबरच सहार विमानतळ, वांद्रे कुर्ला संकुल कोविड केंद्र, दहिसर जकात नाका कोविड केंद्र, दहिसर कांदरपाडा कोविड केंद्र या ठिकाणी जानेवारी २०२० पासून सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले होते. ३० सप्टेंबरपर्यंत या कंत्राटाची मुदत आहे. यासाठी पालिका सात कोटी नऊ लाख रुपये खर्च करणार आहे.