मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून बोगदा केला जाणार आहे. यासाठी १९.४३ हेक्टर पर्यायी जागा व त्या जागेवरील पर्यायी वनीकरण प्रकल्पाचा खर्च महापालिकेला द्यावा लागणार आहे. त्यामुळे राज्याच्या वनविभागाला महापालिकेकडून एक कोटी ४४ लाखांचा निधी देण्यात येणार आहे.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता हा महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. या मार्गावर गोरेगाव फिल्मसिटी ते मुलुंड अमरनगर या दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून ४.७० कि.मी लांबीचे दोन बोगदे बनवण्यात येणार आहेत. प्रस्तावित बोगदा राष्ट्रीय उद्यानाखालून जात असल्याने १९.४३ हेक्टर पर्यायी जागा व त्या जागेवरील पर्यायी वनीकरण प्रकल्पाचा खर्च महापालिकेने जमा करावा, अशी अट घालण्यात आली होती.
त्यानुसार पर्यायी वनीकरणासाठी एकूण १९.५० हेक्टर जागा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत चिमूर तालुक्यातील खासगी जमीन खरेदी करून वनविभागाच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली आहे. या जागेवर पर्यायी वनीकरणाची योजना राबविण्यासाठी वनविभागाकडून ब्रह्मपुरी उपवनसंरक्षक व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक यांनी अनुक्रमे एक कोटी एक लाख ४३ हजार ४६६ व ४२ लाख ९५ हजार १९३ एवढा अंदाजित खर्च कळवला. त्यानुसार हा निधी देण्यात येणार आहे.