चेतन ननावरे
मुंबई : एसटी महामंडळात नोकरी करायची असेल, तर यापुढे कोणत्याही विभागातून अन्य विभागात बदलीसाठी अर्ज सादर करणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र उमेदवारांना भरून द्यावे लागणार आहे. यापुढील सर्व जिल्हानिहाय भरतीच्या जाहिरातींमध्ये हा प्रतिज्ञापत्राचा मजकूर छापण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या सूचना दिल्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
दिवाकर रावते म्हणाले, यासंदर्भात जाहिरातीमध्येच अर्जाचा मजकूर छापला जाईल. प्रत्येक जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल. इतर जिल्ह्यातील उमेदवाराने नोकरीसाठी संबंधित जिल्ह्यातून अर्ज केल्यास हरकत नाही. मात्र आयुष्यभर त्या ठिकाणी नोकरी करायची तयारी संबंधित उमेदवारी ठेवावी. आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि कुठल्याही पुढाºयाने बदलीसाठी पत्र दिल्यास त्यावर कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे भविष्यात बदल्यांवरून आणखी गोंधळ होणार नाही, असेही रावते यांनी सांगितले.एसटी कामगार सेनेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे प्रत्येक जिल्ह्यातील उमेदवारांना न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी व्यक्त केली आहे. रेडकर म्हणाले, बदल्यांसारख्या कामांऐवजी कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटनेला भविष्यात शक्ती खर्च करता येईल. तसेच प्रामाणिकपणे काम करणाºया कामगारांनाही बदल्यांचा फटका बसणार नाही. काहीच दिवसांपूर्वी महामंडळाने घेतलेल्या बदलीच्या निर्णयामुळे कामगारांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच बहुसंख्य कामगारांनी आमदार, खासदार आणि विभागातील मंत्र्यांची शिफारसपत्रे घेऊन महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयावर गर्दी केली होती. मात्र त्याचा नाहक त्रास महामंडळातील अधिकाºयांना झाला होता. परिणामी, या नव्या निर्णयामुळे या सर्व प्रकारांना आळा बसणार आहे.‘नंतर बघू’ चालणार नाही!नोकरीसाठी एका विभागातील उमेदवार दुसºया विभागातून अर्ज करत होते. नोकरीसाठी अर्ज करण्यात गैर नाही. मात्र नंतर बदली करून घेता येईल, या इराद्याने ते भरती व्हायचे. यापुढे मात्र ‘नंतर बघू’ असा पवित्रा चालणार नाही. - दिवाकर रावते, परिवहन मंत्री