- मनोहर कुंभेजकर । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: निवडणुकीच्या काळातच मतदारासंघातील नागरिकांना भेटायचे आणि निवडून आल्यावर पाच वर्षे गायब व्हायचे, अशी काहीशी प्रथा सर्वत्र असली, तरी पश्चिम उपनगरात मात्र, एक तरुण नगरसेविका आपल्या साडेपाच महिन्यांच्या तान्हुल्यासह प्रभागातील समस्यांचा आढावा घेत असल्याचे दृष्य पाहावयास मिळत आहे. पावसाळ्याला काही दिवसांचा अवधी उरल्याने, त्यापूर्वी भागातील नालेसफाईची कामे पूर्ण करून घेण्यासाठी चिमुकल्या सांचेझसह ऊन्हातान्हाची पर्वा न करता, प्रशासनाकडून कामे करून घेत आहेत. मालाड पश्चिमेकडील खाडीपलीकडील मनोरी गावातून प्रभाग क्रमांक-३२ काँग्रेसच्या नगरसेविका स्टेफी केणी यांची सांचेझ या आपल्या मुलासहितची प्रभागातील ‘परेड’ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवेळी स्टेफी यांनी प्रचार दीड महिन्याच्या सांचेझला सोबत घेऊनच करायच्या. आता पालिकेच्या सर्वसाधारण सभा, प्रभाग समितीची बैठक, पालिकेच्या पी उत्तर कार्यालयातील बैठकीला त्याच्यासह हजेरी लावतात. पालिकेच्या कामकाजावेळी पती मारियो ग्रेसियस हे सांचेझला सांभाळतात. त्यासाठी त्यांनी खास सुट्टी घेतली आहे. आपले वडील आणि ईस्ट इंडियन कम्युनिटीत प्रतिष्ठित नाव असलेल्या मॉरिस केणी, तसेच मालाड पश्चिम येथील काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचे मोलाचे सहकार्य मिळते, असे स्टेफी केणी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. जनकल्याण नगर खारोडी राठोड़ी मालवणी शंकर वाडी,पटेल वाडी, चिकू वाडी,बाबरेकर नगर, जुनी आणि नवीन म्हाडा वसाहत या सुमारे ४५ हजार लोकवस्तीतील समस्या सोडवण्यासाठी नगरसेवकपदाच्या कारकिर्दीत ठोस प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पालिकेत पाळणाघराची आवश्यकतादेशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात तान्ह्या बाळासाठी साधी स्तनपान आणि पाळणाघराची सुविधा नसणे, ही दुर्दैवी बाब असल्याची खंत स्टेफी केणी यांनी व्यक्त केली.त्याबाबत आपण पालिका आयुक्त अजय मेहता आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर प्रशासनाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या त्यांना विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी, मुख्यालयातील दालन बाळाच्या स्तनपान आणि विश्रांतीसाठी उपलब्ध करून दिले आहे
नगरसेविका करतेय तान्हुल्यासह कामे
By admin | Published: May 17, 2017 5:19 AM