Join us

मुंबईकरांच्या आरोग्यावर नगरसेवक, आमदार गप्पच

By admin | Published: July 08, 2016 1:38 AM

मुंबईतील नगरसेवक आणि आमदार मुंबईकरांच्या आरोग्याबाबत मात्र मौनीबाबा झाले आहेत. गेल्या वर्षभरात मुंबईतील ११५ नगरसेवकांनी महापालिका सभागृहात तर चार आमदारांनी २०१४ हिवाळी

मुंबई : मुंबईतील नगरसेवक आणि आमदार मुंबईकरांच्या आरोग्याबाबत मात्र मौनीबाबा झाले आहेत. गेल्या वर्षभरात मुंबईतील ११५ नगरसेवकांनी महापालिका सभागृहात तर चार आमदारांनी २०१४ हिवाळी अधिवेशन व २०१५मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबईकरांच्या आरोग्याबाबत एकही प्रश्न विचारला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.प्रजा फाउंडेशनने माहिती अधिकारात ही माहिती उघड केली आहे. मुंबई महापालिकेत मुंबईकरांनी एकूण २२७ नगरसेवक निवडून दिलेले आहेत. मात्र त्यापैकी ५० टक्के म्हणजेच ११५ नगरसेवकांनी महापालिका सभागृहात आरोग्याबाबत एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या वर्षभराच्या कालावधीत एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही. तर उरलेल्या ११२ नगरसेवकांनी आरोग्याबाबत ४१२ प्रश्न उपस्थित केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आरोग्य समितीमध्ये असलेल्या ३६ नगरसेवकांमधील चार नगरसेवकांनीही मौन बाळगल्याची माहिती आहे. विधानसभेतही मुंबईतील चार मंत्री वगळल्यास उरलेल्या ३२ आमदारांपैकी ४ आमदारांनी आरोग्याबाबत मौनीबाबाची भूमिका घेतल्याचे दिसते. या चार मौनीबाबांमध्ये रमेश लटके, राम कदम, तृप्ती सावंत, तमिल सेल्वन यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)