मुंबई : वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि सॅप प्रणालीमुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पात राखीव निधी, तसेच नगरसेवक निधी पडून आहे. परिणामी, गेल्या आठ महिन्यांपासून प्रभागातील विकास कामे ठप्प आहेत. त्यामुळे नगरसेवक हवालदिल झाले आहेत. निधी वापरण्याचा कालावधी वाढविण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली.अर्थसंकल्पातील तरतूद व नगरसेवक निधी १ आॅक्टोबरपासून विकास कामांसाठी वापरण्यास सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र, या विकास कामांसाठी निविदा तयार असतानाही सॅप प्रणाली २१ आॅक्टोबरपर्यंत बंद होती. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांत केवळ गटार, नाले, शौचालयांची कामे होताना दिसत आहेत. हा निधी खर्च करण्यासाठी दिलेला कालावधीही अपुरा आहे. लोकांना काय उत्तर द्यायचे? असा सवाल शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी केला.या हरकतीच्या मुद्द्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा देत, निधीचा कालावधी वाढविण्याची मागणी केली. सॅप व जीएसटीमुळे हा निधी रखडला आहे. त्यामुळे निधी खर्च करण्यासाठी चार महिनेच शिल्लक आहेत, तर निधीअभावी विभागात कामे ठप्प असल्याने अशा निधीचा काय उपयोग? असा सवाल नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी केला. सर्वच पक्षांनी प्रशासनाला धारेवर धरल्यामुळे, पुढच्या बैठकीत यावर उत्तर सादर करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर यांनी प्रशासनाला दिले.
नगरसेवक निधीला जीएसटीचा फटका, प्रभागातील कामे लटकली; नगरसेवक हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 2:11 AM