पनवेल : दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यासाठी २८ रोजी पनवेल नगरपरिषदेचे नगरसेवक हिमाचल प्रदेशातील कुलू मनाली याठिकाणी गेले आहेत. प्रशिक्षणाचा कालावधी संपूनही ते परतले नसून हे नगरसेवक पिकनिकमध्येच मश्गूल असल्याने पनवेलमधील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. नगरपरिषदेच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले जाते. त्यासाठी नियोजनाची तरतूद देखील नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येते. पनवेल नगरपरिषदेचे २० नगरसेवक या दौऱ्यासाठी कुलू मनालीला गेले आहेत, मात्र शहरामध्ये खड्डे, अनधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नासह अनेक समस्या आ वासून उभ्या असताना नगरसेवक पिकनिकमध्येच रमल्याचे दिसून येत आहे. दि. २९ ते ३० या दोन दिवसात हा दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी बुधवारी २८ रोजी थेट विमानानेच या नगरसेवकांनी कुलू मनाली गाठली. या दौऱ्यासाठी सर्व खर्च नगरसेवकांनी उचलला असला तरी एकाच वेळी सर्वच नगरसेवक शहराबाहेर असल्याने रहिवाशांनी समस्या कोणाकडे मांडायच्या? दोन वर्षांपूर्वी पनवेलमधील नगरसेवक केरळला अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते. या दौऱ्यातून नगरसेवकांनी नेमके काय साधले हेही गुलदस्त्यात आहे. पनवेलच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
नगरसेवक पिकनिकमध्येच मग्न
By admin | Published: February 01, 2015 10:47 PM