मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे मुंबई शहर आणि उपनगरात विविध प्रकल्प उभारताना सल्लागारांवरही कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र अशा सल्लागारांकडून महापालिकेची दिशाभूल केली जात असेल तर संबंधितांना महापालिकेच्या कारभारातून हद्दपार करण्यात यावे, अशी एकमुखी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत केली. महत्त्वाचे म्हणजे सल्लागारांना हद्दपार करून अभियंत्यांचे पॅनल तयार केले जावे, असा मुद्दाही नगरसेवकांनी बैठकीत मांडत ढिसाळ नियोजन करत पूल बंद करण्यात येत असल्याने मुंबईची कोंडी होत आहे. परिणामी नगरसेवकांनी याबाबतही संताप व्यक्त केला.
फोर्ट येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर सल्लागारांनी दिशाभूल केल्याची टीका झाली. या दुर्घटनेनंतर मुंबई शहर आणि उपनगरातील सर्वच पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला. पुलांची तपासणी हाती घेण्यात आली. काही पुलांची पुनर्बांधणी सुरू करण्यात आली. मात्र हे करताना मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेची कोंडी होते. नेमके याच मुद्द्यांचे पडसाद बैठकीत उमटले. मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांची दुरवस्था सल्लागारांमुळे झाली आहे. पूल कधी बंद केले जातात, ते कळत नाही. पूल कधी सुरू होणार, याची माहिती मिळत नाही. सल्लागार स्वत:साठी काम करतात का? पालिकेत सल्लागारांची लॉबी आहे. परिणामी सल्लागारांची मक्तेदारी मोडीत काढा आणि अभियंत्यांचे पॅनल तयार करा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. महत्त्वाचे म्हणजे नियोजन करून पुलाचे काम हाती घेतले पाहिजे. प्रत्यक्षात मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते.
रस्त्यालगतच्या गटारांची सफाई नाही!पावसाळ्यापूर्वी ९० टक्के नालेसफाई करण्यात आली आहे, असा दावा प्रशासनाने केला. मात्र यावरही बैठकीत टीका करण्यात आली. मोठे नाले, रस्त्यालगतची मोठी गटारे यांची सफाई झालेली नाही. पालिकेकडे सफाई यंत्रणा नाही. परिणामी या वेळीही मुंबई तुंबणार असल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली.