मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी एकनाथ शिंदेंचं जल्लोषात स्वागत होत असून स्थानिक पातळीवरही शिवसेनेत दोन गट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. आता, मुंबईतील शिवसेनेच्या पहिल्या नगरसेविका आणि शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Shital Mhatre) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे बंडखोर आमदारांना त्यांनी यापूर्वी इशारा दिला होता.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाचा मुंबई महापालिकेत (BMC) शिवसेनेला छेद पडण्यास सुरुवात झाली आहे. शीतल म्हात्रे या दहीसर पश्चिम येथील वॅार्ड क्रमांक ७ च्या नगरसेविका होत्या. शीतल म्हात्रे दोन वेळा नगरसेवकपदी निवडून आल्या. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वीच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दहीसर, बोरिवली आणि मागाठाणे मतदारसंघात निष्ठा यात्रा काढली होती. मात्र, त्यानंतरही शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
दरम्यान, शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटातील आमदारांना इशारा दिला होता. मुंबईत आल्यावर काय ते झाडी, काय डोंगार, काय हाटील या डायलॉगवरुन खिल्ली उडवत मुंबईत आल्यावर काय तो दांडा... असे म्हणत मारण्याची भाषा केली होती. मात्र, आता त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
एकनाथ शिंदेंकडून स्वागत
मुंबईतील दहिसर विभागातील माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना प्रमाण मानून हिंदुत्वाचा विचार स्वीकारून आम्हाला साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांचे मनापासून स्वागत करत भावी सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीकरिता शुभेच्छा दिल्या, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित शीतल म्हात्रे यांना भविष्यात आपल्या प्रभागातील लोकोपयोगी विकासकामे करावीत व त्याकरिता सर्वतोपरी सहकार्य आपण करू, असे आश्वासनही शिंदे यांनी यावेळी दिले.