मुंबई : मालाडच्या वनजमिनीवर असलेल्या पिंपरी पाड्यामध्ये मूलभूत सुविधा तसेच विकासकामांसाठी ना-हरकत प्रमाणपत्र आणि पिंपरीपाडा ते पाल नगरपर्यंतच्या ७० मीटर रस्त्यांच्या नूतनीकरणाचे काम वनविभागाकडून गेल्या तीन वर्षांपासून अडवून ठेवण्यात आले आहे. त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्र.४२ च्यावतीने मालाड विकास प्रतिष्ठानाकडून संयुक्तरीत्या वनविभाग प्रशासनाचा निषेध करण्यासाठी नगरसेविका धनश्री वैभव भरडकर यांनी गुरुवारी एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन केले. या आंदोलनानंतर रस्त्याचे नुतनीकरणास करण्यासाठी एनओसी मिळविण्यात त्यांना यश मिळाल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव भरडकर यांनी सांगितले.
मालाडच्या पिंपरीपाडा ते पालनगर या ७० मीटर रस्त्याचे नूतनीकरणाचा प्रस्ताव मुंबई महापालिकेकडून ३ वर्षांपासून वनविभाग, बोरीवली या कार्यालयाकडे पाठपुरावा करूनसुध्दा प्रशासनातील काही जबाबदार अधिकारी दुर्लक्ष करत होते. यामुळे पावसात नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. तरीसुध्दा वनविभाग सदर कामासाठी एनओसी देत नव्हते. त्यांच्या याच आडमुठ्या धोरणाविरोधात निषेध करण्यासाठी गुरुवारी पालनगरामध्ये स्थानिक रहिवाशांसह नगरसेविका भरडकर, मालाड विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव भरडकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोळा झाले होते.