नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर
By admin | Published: April 26, 2017 12:39 AM2017-04-26T00:39:43+5:302017-04-26T00:39:43+5:30
मांसाहारी नागरिकांना घर नाकारणाऱ्या विकासकाविरोधात पोलिसांत जाण्याचा सल्ला देणाऱ्या पालिका प्रशासनाला नगरसेवकांनी सुधार समितीत फैलावर घेतले.
मुंबई : मांसाहारी नागरिकांना घर नाकारणाऱ्या विकासकाविरोधात पोलिसांत जाण्याचा सल्ला देणाऱ्या पालिका प्रशासनाला नगरसेवकांनी सुधार समितीत फैलावर घेतले. यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, त्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत बदल करून सकारात्मक उत्तर द्यावे, अशी मागणी शिवसेनेसह विरोधकांनी केली. त्यामुळे ही सूचना चौथ्यांदा फेरविचारासाठी परत पाठविण्यात आली.
मांसाहारी नागरिकांना घर नाकारल्याचे प्रकार आढळून आल्यास, या संबंधित विकासकांना बांधकाम आराखडे, प्रमाणपत्र, जलजोडणी यासारख्या सुविधा पालिकेतर्फे स्थगित कराव्यात, अशी ठरावाची सूचना मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी मांडली, परंतु हा मुद्दा पोलिसांच्या अधिकार कक्षात येत असल्याने, निर्णय घेण्यास प्रशासनाने नकार दिला. सुधार समितीच्या बैठकीत हाच प्रस्ताव पुन्हा मंगळवारी मांडल्याने, आयुक्तांनी फेरविचार करावा, अशी मागणी विरोधकांसह शिवसेनेने केली. (प्रतिनिधी)