नगरसेवकांच्या उदासीनतेचा मुंबईकरांना बसतोय फटका
By Admin | Published: April 29, 2015 02:19 AM2015-04-29T02:19:14+5:302015-04-29T02:19:14+5:30
निवासस्थान असलेल्या डी वॉर्डावरच कचऱ्याचे संकट ओढावणार असल्याचा धक्कादायक अंदाज प्रजा फाउंडेशन या संस्थेने आपल्या पाहणी अहवालातून व्यक्त केला आहे़
मुंबई : नागरी प्रश्न सोडविण्यात मुंबई महापालिकेची अकार्यक्षमता व हलजर्गीमुळे पुढील दोन वर्षांत अति महत्त्वाच्या व्यक्तींचे निवासस्थान असलेल्या डी वॉर्डावरच कचऱ्याचे संकट ओढावणार असल्याचा धक्कादायक अंदाज प्रजा फाउंडेशन या संस्थेने आपल्या पाहणी अहवालातून व्यक्त केला आहे़ नगरसेवकांची उदासीनता आणि नागरी समस्या हाताळण्यात अक्षम्य दुर्लक्षाचा फटका नागरी सुविधांना बसत असल्याचे या अहवालातून निदर्शनास आले आहे़
दोन वर्षांत उच्चभ्रू वस्तीत पेटणार कचऱ्याचा प्रश्न
राज्यपाल, पालिका आयुक्तांचे निवासस्थान, वाळकेश्वर, मलबार हिल, पेडर रोड, नेपियन्सी रोड, भुलाभाई देसाई मार्ग अशा या उच्चभ्रू वस्तीमध्येच पुढील दोन वर्षांत कचऱ्याचा प्रश्न पेटणार आहे़
असा
काढला अंदाज
माहिती अधिकाराचा वापर तसेच वॉर्डांमध्ये सर्वेक्षण करून ‘प्रजा’ या संस्थेने हा अहवाल तयार केला आहे़ २००८ ते २०१४ या सहा वर्षांमध्ये वॉर्डांमधील समस्यांचा अभ्यास करून २०१५ ते २०१७ या दोन वर्षांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़
काही वॉर्डांसाठी धोक्याची घंटा
विशेष म्हणजे या वॉर्डसाठी पालिकेने नियमित स्वच्छतेचे कंत्राट काही दिवसांपूर्वीच दिले आहे़ याव्यतिरिक्त पी उत्तर वॉर्ड म्हणजेच मालाड, मालवणी भागामध्ये पाणीप्रश्न तर कुर्ला वॉर्डाला सांडपाणी व रस्त्याची समस्या भेडसावेल, अशी आगाऊ सूचना ‘प्रजा’ने दिली आहे़ २०११ ते २०१४मधील साथीच्या आजारांनी बळींच्या आकडेवारीनुसार सहा वॉर्डांसाठी या अहवालातून धोक्याची घंटा वाजविण्यात आली आहे़
दूषित पाणीपुरवठ्यामुळे कांदिवली, मालाड, मालवणी, अंधेरी पश्चिम या वॉर्डांमध्ये अतिसाराच्या तक्रारी वाढतील़ या वॉर्डांमध्ये गेल्या वर्षभरात १९६ केसेस अतिसाराच्या होत्या़
कीटकनाशक विभागाकडून नियमित व दर्जेदार अळीनाशक फवारणी होत नसल्यामुळे जोगेश्वरी व अंधेरी पूर्व-पश्चिम आणि मालाडमध्ये मलेरिया व डेंग्यूचा धोका संभावतो़ या वॉर्डांमध्ये २०१४ या वर्षी मलेरिया आणि डेंग्यूच्या सर्वाधिक ७५ तक्रारी होत्या़ - वृत्त/हॅलो