नगरसेवकांची हॉटेलात बडदास्त
By admin | Published: December 27, 2015 01:21 AM2015-12-27T01:21:40+5:302015-12-27T01:21:40+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या बंडखोरीमुळे विधान परिषदेची निवडणूक चुरशीची ठरणार आहे़ या निवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता असल्याने शिवसेना, काँग्रेस आणि
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या बंडखोरीमुळे विधान परिषदेची निवडणूक चुरशीची ठरणार आहे़ या निवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता असल्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही खबरदारी घेतली जात आहे़ यासाठी पॉश हॉटेलमध्ये बडदास्त ठेवण्यात आल्याने नगरसेवकांची मात्र चंगळ झाली आहे़
मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर दोन जण निवडून जाणार आहेत़ पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना शिवसेनेतून तर काँग्रेसमधून भाई जगताप यांना उमेदवारी मिळाली आहे़ मात्र राष्ट्रवादीमधून बंडखोरी करून प्रसाद लाडही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपाच्या मदतीने शिवसेनेच्या उमेदवाराला शंभर नगरसेवकांची पहिल्या पसंतीची मते मिळतील़ मात्र शिवसेनेला पाठिंबा देणारे अपक्ष, भाजपा, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षातील फुटीर नगरसेवकांच्या मदतीने लाड यांची व्यूहरचना सुरू असल्याची चर्चा आहे़ यामुळे काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे़
सपाचे बळ
समाजवादी पक्षामध्ये आठ नगरसेवक आहेत़ अटीतटीच्या लढतीत या नगरसेवकांचे बळ निर्णायक ठरू शकेल़ त्यामुळे या नगरसेवकांचे मत आपल्या उमेदवाराच्या बाजूने वळविण्यासाठी अन्य पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत़ सपानेही आपल्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलविले आहे़
दगाफटका होण्याच्या भीतीने राजकीय पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी नगरसेवकांची मात्र चंगळ सुरू आहे़ शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकित नजरकैदेत ठेवण्यात आले आहे़ तर काँग्रेसच्या नगरसेवकांना दमणमधील पाहुणचारानंतर आता मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.