पंकज पाटील, अंबरनाथअंबरनाथ आणि बदलापुरात बांधकाम व्यावसायिकांना येत्या निवडणुकांत नगरसेवकपदाचे वेध लागले आहेत. काही बिल्डर स्वत: निवडणूक रिंगणात आहेत, तर काहींनी आपल्या पत्नीला रिंगणात उतरविले आहे. एकतर, या भागात वाढत असणाऱ्या बांधकामांमुळे बक्कळ पैसा खेळत आहे. निवडणुकीच्या राजकारणात ही लॉबी जर खरेच यशस्वी झाली तर अनधिकृत बांधकामांमध्ये वाढ व पालिकेच्या त्या विरोधातील मोहिमेला खीळ बसण्याची शक्यता नागरिक व्यक्त करीत आहेत. अंबरनाथ आणि बदलापुरात यापूर्वीही सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना त्याचा थेट जनसंपर्क किती आहे, हे न पाहता त्यांची आर्थिक स्थिती कशी आहे, याचकडेच जास्त लक्ष दिले. या शहरात वाढते नागरिकीकरण पाहता लहान बांधकाम व्यावसायिकदेखील प्रस्थापित झाले आहेत. मात्र, असे असूनही त्यांना आपल्या व्यावसायिक कामासाठी पालिकेवर अवलंबून राहावे लागते. नगरसेवक झाल्यास ते काम अत्यंत सहजरीत्या करता येत असल्याचा यापूर्वीचा अनुभव असल्याने प्रत्येकाला नगरसेवक होण्याचे वेध लागले आहेत. बांधकाम व्यावसायिक कमी की काय, म्हणून त्यात बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सदेखील या नगरसेवकपदासाठी रिंगणात उतरले आहेत. हाच कित्ता गिरवित आर्किटेक्ट, इंटिरिअर डेकोरेटर, आरसीसी कन्सलंट हे देखील निवडणुकीत उतरले तर आश्चर्य वाटू नये.
बिल्डरांना नगरसेवकपदाचे वेध
By admin | Published: April 10, 2015 12:20 AM