Join us

दोन अपत्यांचा नियम मोडल्याने नगरसेविकेचे पद रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:05 AM

मुंबई : सोलापूर महापालिकेच्या शिवसेनेच्या अनिता मगर यांचे नगरसेविका हे पद सोलापूर न्यायालयाने २०१८ मध्ये रद्द केले. सोलापूर न्यायालयाच्या ...

मुंबई : सोलापूर महापालिकेच्या शिवसेनेच्या अनिता मगर यांचे नगरसेविका हे पद सोलापूर न्यायालयाने २०१८ मध्ये रद्द केले. सोलापूर न्यायालयाच्या या निर्णयावर सोमवारी उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. त्यांना दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याने सोलापूर न्यायालयाने त्यांचे नगरसेवक म्हणून पद रद्द केले होते.

सोलापूर न्यायालयाच्या या निर्णयाला अनिता मगर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. सी.व्ही. भडंग यांच्या एकल खंडपीठाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. मात्र, न्या. भडंग यांनी त्यांच्या आदेशाला चार आठवडे स्थगिती दिली, जेणेकरून मगर यांना अन्य कायदेशीर पर्याय अवलंबता येतील.

२०१७ मध्ये झालेल्या सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत मगर यांनी प्रभाग क्रमांक ११(सी)मधून उमेदवारी अर्ज भरला. २३ फेब्रुवारी २०१७ रोजी त्या प्रभागमधून निवडून आल्या. त्यांना त्या प्रभागमधून सर्वाधिक मते मिळाली. त्यांच्यापाठोपाठ भाग्यलक्ष्मी महंता यांना अधिक मते मिळाली. पण महंता यांनी याला सोलापूर न्यायालयाला आव्हान दिले. मगर यांना दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याने त्यांनी राज्य सरकारच्या दोन अपत्य असण्याच्या नियमाचे उल्लंघन केले आहे, असे महंता यांनी याचिकेत म्हटले आहे.