लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शहरातील काही भागात पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याचा प्रश्न नगरसेवकांनी मांडला असून, उन्हाळा सुरु होण्यापूर्वी यासंदर्भात पाहणी करुन आणि आढावा घेऊन शहरात पाणीटंचाई निर्माण होणार नाही, यासाठी कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केल्या.
मुंबई महापालिकेच्या परिमंडळ ६ मधील एस वॉर्डातील सुरू तसेच प्रस्तावित विविध पायाभूत सुविधांच्या विकासकामांचा आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. पवई लेकचे सुशोभिकरण, परिसरात पायाभूत सुविधांचा विकास, पाथवेचा विकास, पर्यटनाच्या अनुषंगाने सोयी-सुविधा निर्माण करण्यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. परिमंडळ ६ मधील विविध विकासकामांचा ठाकरे यांनी आढावा घेऊन या कामांना चालना द्यावी आणि ही कामे गतिमान करावी, अशा सूचना केल्या आहेत.
वरळी-शिवडी कनेक्टर संदर्भातही ठाकरे यांनी या मार्गाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या पुलाच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवून काम जलदगतीने पूर्ण व्हावे, यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा झाली.