Join us

नगरसेवकांना बिल्डरांकडून आत्महत्येच्या धमक्या !

By admin | Published: November 05, 2015 12:41 AM

परमार यांच्या आत्महत्येनंतर इतरही बांधकाम व्यावसायिक आत्महत्या करण्याची धमकी देत असल्याचा आरोप बुधवारच्या महासभेत लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांनी केल्याने

ठाणे : परमार यांच्या आत्महत्येनंतर इतरही बांधकाम व्यावसायिक आत्महत्या करण्याची धमकी देत असल्याचा आरोप बुधवारच्या महासभेत लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांनी केल्याने खळबळ उडाली. आम्ही कुठल्याही तक्रारी करीत नाही तसेच याआधी केलेल्या तक्रारी मागे घेतो, अन्यथा आम्हीच आत्महत्या करतो, अशी टोकाची भाषा या सदस्यांनी करून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.अनधिकृत होर्डिंग्जच्या विरोधात तक्रार केल्यानंतर संबंधित होर्डिंग्जधारकाने फोन आणि एसएमएस करुन धमकी देण्यास सुरुवात केली आहे, असा दावा राष्ट्रवादीचे नगरसेवक मिलिंद पाटील यांनी केला. होर्डिंग्जविरोधात तक्रार कराल तर मी सुद्धा आत्महत्या करुन चिठ्ठीत तुमचे नाव लिहीन, अशी धमकी त्याने दिल्याचा गौप्यस्फोट पाटील यांनीच सभागृहात केला. त्यामुळे यापुढे आम्ही तक्रारी करायच्या की नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मी माझे यापूर्वीचे प्रश्न मागे घेतो. कारवाई करा, नाही तर करु नका, परंतु उद्या त्याचे भोग माझ्या कुटुंबाला नको म्हणत पाटील यांनी प्रशासनाचा निषेध केला.त्याला अमित सरय्या यांनी पाठिंबा दिला. खोपट येथील अनधिकृत इमारतींबाबत आपण तक्रार केली होती. विकासकाने २० मजल्यांना परवानगी असताना २४ मजले बांधले. पालिकेने त्याला दीड कोटींचा दंड केला. परंतु, धमक्या येणार असतील तर तक्रारच न केलेली बरी, असे राष्ट्रवादीचे नगरसेवक मिलिंद पाटील यांनी सांगितले.