Join us

नगरसेवकांचीही आता हजेरी लागणार

By admin | Published: April 16, 2016 1:36 AM

जनतेने निवडून पाठविलेल्या लोकप्रतिनिधींनी नागरी प्रश्नावर आवाज उठविणे अपेक्षित आहे़ मात्र महासभेसाठी मुख्यालयात येणारे नगरसेवक हजेरीपटावर सही

मुंबई : जनतेने निवडून पाठविलेल्या लोकप्रतिनिधींनी नागरी प्रश्नावर आवाज उठविणे अपेक्षित आहे़ मात्र महासभेसाठी मुख्यालयात येणारे नगरसेवक हजेरीपटावर सही झाल्यावर लगेच पळ काढतात़ यापैकी अनेक जण ताकीद देऊनही पक्षनेत्यालाही जुमानत नसल्याने नगरसेवकांसाठीही बायोमेट्रिक मशिनद्वारे हजेरी व सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्याचा ठराव गटनेत्यांकडूनच पुढे आला आहे़मुंबई महापालिकेत २३२ नगरसेवक असून, यापैकी पाच नामनिर्देशित आहेत़ सर्व आर्थिक प्रस्ताव, धोरणात्मक निर्णय, अर्थसंकल्पीय तरतुदी आदींसाठी पालिकेच्या महासभेची अंतिम मंजुरी लागते़ तसेच नागरी प्रश्नांवर चर्चा करून प्रशासनाला धारेवार धरण्यासाठी पालिका महासभा हे प्रभावी व्यासपीठ आहे़ मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आवश्यक संख्याबळाअभावी पालिकेच्या महासभेला लेट मार्क लागत आहे़हजेरी लागल्यावर सभागृहाबाहेरूनच पळ काढणाऱ्या नगरसेवकांवर वॉच ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्याची मागणी अनेक वेळा झाली़ मात्र अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे सत्ताधारी भाजपा गटनेते मनोज कोटक यांच्याकडूनच पुढे आली आहे़ पालिका महासभेच्या येत्या बैठकीत ही सूचना मंजूर होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)

महासभेच्या दर महिन्याला कमाल चार बैठका होतात़ कामकाजानुसार या बैठका आयोजित करण्यात येतात़ प्रत्येक बैठकीच्या उपस्थितीसाठी नगरसेवकांना दीडशे रुपये मानधन मिळते़छत्रपती शिवाजी टर्मिनसबाहेरील पालिका मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या सभागृहाबाहेर हजेरीपट ठेवण्यात येतो़नगरसेवक या हजेरीपटावर पक्षनिहाय सह्या करून पळ काढतात़ पक्षातून व्हिप काढण्यात आल्यावर मात्र सभागृह हाऊसफुल्ल होत असते़नगरसेवक सभागृहात लवकर येत नसल्याने गेल्या काही वर्षांमध्ये अडीच वाजताचे सभागृह चार वाजता सुरू होऊ लागले आहे़